त्रिगुणात्मक त्रैमूर्ती श्री दत्त योगी

    दिनांक : 07-Dec-2019
संपूर्ण जग त्रिगुणात्मक आहे. म्हणजेच सत्व, रज, तमाने ते युक्त आहे व या संपूर्ण जगाचे स्वामी सिद्धराज आहेत. असे हे सर्व देवांचे गुरू ‘श्री गुरूदेव दिगंबर’. यांचा जन्म कृत युगामध्ये मार्गशीर्ष शु. 15ला माहुर गडावर अत्री ऋषी व त्यांची पत्नी अनुसूया (जिला कोणाविषयी असूया नाही अशी) यांचे पोटी झाला. अनुसूया ही कर्दन ऋषिची कन्या होती व अत्री ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते.

j_1  H x W: 0 x 
 
दत्तात्रयाचा कलियुगातील पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हे होते. आंध्र प्रांतातील पूर्व गोदावरी जिल्ह्यांत पीठापुरम्‌ येथे ई. स 1320 मध्ये पौष शु. 4ला त्यांचा जन्म झाला. वेदमूर्ती ब्राह्मण श्री आपाळराज व साध्वी सुमती हे त्यांचे आई-वडील. त्यांनी सोळाव्या वर्षीच संन्यास घेतला व अनेक लिला केल्यात. अश्र्विन वद्य 12 ला ई.स. 1350 मध्ये श्री क्षेत्र पुरवपूर, जि. रायपूर (आंध्र) येथे गंगेत ते अदृष्य झालेत.
 
कलियुगातील दुसरा अवतार श्री नृिंसह सरस्वती हे होते. विदर्भातील कारंजा लाड येथे पौष शु. 2 ई.स. 1378 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडीलांचे नाव माधव व आईचे नाव अंबा. जन्मल्या बरोबर त्यांनी ॐ उच्चार केला. सात वर्षे ते कांहीच बोलले नाहीत. नंतर त्यांची मौज झाली. मौंज होताच ते चारही वेद म्हणू लागले. काशीला जाऊन त्यांनी संन्यास घेतला होता. ई.स. 1457 मध्ये माघ वद्य प्रतिपदेस भीमा अमरजा संगमावर पुष्पचक्राचे आसनांवर बसून ते कर्दळी वनांत निघून गेलेत.
 
 
 
कलियुगांतील तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ इ.स. 1818 मध्ये आठ वर्षांची ही दिव्य मूर्ती वारूळांतून प्रगट झाली. 1857 ते 1878 पर्यंत 21 वर्षे हे अक्कलकोट येथेच राहात होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांनी अनेक चमत्कार केलेत. तसेच यांचे शिष्य उच्च कोटीचे प्रसिद्ध संत झालेत. यांचे सर्व भक्तांना आश्वासन आहे की, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’. शके 1800 ई.स. 1878 बहु धान्यनाम संवत्सरात चैत्र वद्य 13 मंगळवारी 4 वाजता श्री श्रेत्र अक्कलकोट येथे ते निजधामांस गेलेत.
 
श्री नारदपुराणांत श्री सिद्धराजाच्या दिव्यस्वरूपाचे बहारदार वर्णन संस्कृत भाषेत केलेले आहे. योगी जनवल्लभ समर्थ कसे दिसतात? व कसे आहेत? या विषयी त्यांच्या भक्तांच्या मनांत अत्यंत ओढ असते. त्यांच्या मस्तकावर जटा आहे. हातांत त्रिशूळ असून ते पांडुरंगाचे अंश आहेत. हे कृपानिधी असून सर्वच रोगांचा नाश करणारे आहेत. (रोग तीन प्रकारचे असतात. दैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक) आदी गुरूचे सुंदर स्तोत्र मंत्रासहीत अनुष्टुप छंदात श्री नारदमुनींनी केलेले आहे. ते जगाचे निर्माते असून तेच जगाचे संहार कर्तेही आहेत. भवपाशातून ते भक्तांना मुक्त करतात. ते दयाळू असून भक्ताच्या देहाची शुद्धी करतात. भक्तांची जन्ममृत्यू चक्रातून ते सुटका करतात. स्वत: दिगंबर आहेत. कापरा प्रमाणे त्यांचा वर्ण अतिशुभ्र आहे. वेदशास्त्रपारंगत व ब्रह्मज्ञानीही आहेत. ते अनामी व गोत्र विवर्जित आहेत. ते कृशही नाहीत व स्थुलही नाहीत. पंचमहाभूतांना तेच देदीप्यमान करतात. ते यज्ञप्रिय असून त्यांचे स्वरूपच यज्ञ आहे. ते सिद्ध आहेत. त्यांनी तीन शिरे धारण केलेली आहेत. मध्यभागी श्री विष्णू - डाव्या बाजूला शिवप्रभू व उजव्या बाजुला ब्रह्मदेवता आहे. म्हणजेच त्यांचे त्रिमूर्ती स्वरूप आहे. तेच भोगणारे व तेच भोग्यही आहेत.
 
तेच योग व तेच योगी ही आहेत. तेच जितेंद्रीय असून जित्तज्ञाय आहे. दिव्य रूप धारण करणारे परब्रह्म आहेत. जम्बूद्विपांत म्हणजे आजच्या मराठवाड्यांत मातापूर म्हणजे क्षेत्र माहूरला त्यांचा निवास आहे. त्यांची विजयाची मानसिकता असते. म्हणजेच ते भक्तांना विजय मिळवून देतातच. त्यांचा मनावर संपूर्ण ताबा आहे. ते गावांत जाऊन भिक्षा मागतात. त्यांच्या हातांत सोनेरी भिक्षा पात्र असते. नाना स्वादमय भिक्षेचा आस्वाद ते घेत असतात. त्यांच्या मुद्रेवर ब्रह्मज्ञानाचे तेज सदोदीत तळपत असते. संपूर्ण जगच ही त्यांची वस्त्रे आहेत. म्हणजेच त्यांचे कणाकणांत अस्तित्व आहे. जगांला तेच बुद्धी व प्रकाश देत असतात. ते अवधूत असून सदा आनंदी अवस्थेत असतात. तेच परब्रह्म आहेत. देही व विदेही ही रूपे त्यांचीच. त्यांचेच स्वरूप सत्य आहे. हे सदाचारी, सत्यधर्म परायण आहेत. सत्याश्रमास तेच आधारभूत आहेत. त्यांच्या हातात त्रिशूळ व गदा, गळ्यांत वनमाळा आहे. यज्ञसूत्र धारक ब्रह्मदेव ही तेच आहेत. त्यांचेच स्वरूप क्षर व अक्षर आहे. तेच परतत्व आहेत. दत्तच मुक्तिचे परास्तोत्रही आहे. विद्यादेवी, लक्ष्मीदेवी, दत्ताचीच स्वरूपे आहेत. तेच सगुण व निर्गुण आहेत. शत्रूंचा नाश करणारे, ज्ञान, विज्ञान प्रदान करणारे असे हे श्री. ज्ञानसागाराचे स्तोत्र आहे. सर्वज्ञ यति श्री. कालाग्निक्षमनाचा जय जयकार असतो.
 
हे स्तोत्र अतिव्दिय असून प्रत्यक्ष मायामूक्ती अवधूतच यां निर्मितीचे कारक आहेत. श्री. योगीजन वल्लभाच्या प्रसादामुळे श्री. नारदमुनीची किर्ती प्रगटते आहे. नारदपुराणांतील लिलविश्र्वंभराचे स्तोत्र आता संपूर्ण करीत आहे.
 
ज्यांचे उजवे अंग गुरूरूप असून डावे अंग देवरूप आहे. अशा कृष्णशामकमल श्री दत्ताला मी विनंती करतो की,
तूं माय माझी, पिता तुची माझा। बंधुगुरू देवही तुची माझा
त्वरीत दाखवी पाय तुझे समर्था। तुला सद्गुरू मागणे हेची आता.
 
मो. बा. चरेगांवकर
यवतमाळ
 
9767059328