न्यायालयात सुनावणीसाठी जाताना पिडीतेला जाळून मारण्याचा प्रयत्न

    दिनांक : 06-Dec-2019
उन्नाव: हैदराबामधील महिला डॉक्टरला बलात्कारानंतर जाळून मारल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना सकाळच्या सुमारास पाच तरुणांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पीडितेने पोलिसांनी दिली. यामध्ये पीडित तरुणी ६० ते ७० टक्के भाजली आहे. तिच्यावर सध्या लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ल_1  H x W: 0 x 
पीडिता आज पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या पाच जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, अशी माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास रायबरेली पोलिसांनी केला होता. याच प्रकरणातील हे आरोपी जामिनावर सुटले आहेत.
 
 
बलात्कार पीडितेला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. या तिघांपैकी दोघांवर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला. आज सकाळी पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी तिला जाळण्याचा प्रयत्न झाला.
 
आम्हाला सकाळी या घटनेची माहिती मिळाली. पीडितेने आरोपींची नावे आम्हाला सांगितली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रांत विर यांनी दिली. आम्ही आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केली आहेत. पीडितेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
पीडितेने मार्चमध्ये दोघांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. बलात्कार करुन त्याचे चित्रीकरण केल्याचा आरोप पीडितेने दोघांवर केला होता. यातील एकाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला न्यायालयाने जामीन दिला. तर दुसरा आरोपी फरार होता. आज पीडितेला जाळण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी फरार आरोपीदेखील तिथे होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट जारी करुन त्याच्या संपत्तीवर आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.