कर्मवीर सुधा मूर्ती...

    दिनांक : 06-Dec-2019
श्रीनिवास वैद्य
 
अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीमुळे लोकप्रियतेचे शिखर गाठलेला, ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे आठवड्यातून एकदा ‘कर्मवीर’ व्यक्तीला बोलवण्यात येत असे. शेवटच्या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या सुधा मूर्ती यांना पाचारण केले होते. या कार्यक्रमात सुधा मूर्ती व अभिताभ बच्चन यांच्यात जी प्रश्नोत्तरे झालीत, ती अत्यंत प्रसन्न, प्रेरणा देणारी आहेत.
 

h_1  H x W: 0 x 
 
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील शिखरावरील कंपनी- इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी- सुधा, यांचे जीवनचरित्र केवळ प्रेरणादायीच नाही, तर आपल्या मनातील अनेक ग्रह, संभ्रम, मळभ, गंड, संकोच दूर करणारे आहे, हे विशेष. सध्या त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. धनसमृद्ध सामाजिक संस्थांची समाजसेवा आपण बघतच असतो. परंतु, सुधा मूर्ती यांच्या या संस्थेचे कार्य वेगळ्याच धाटणीचे आहे, असे लक्षात येते. कोट्यधीश असलेली ही व्यक्ती, ज्या सहजतेने, ज्या साधेपणाने समाजात मिसळते, ते आश्चर्यचकित करणारे आहे. समाजाविषयी मनात खोलवर असलेल्या संवेदनशीलतेने त्यांना समाजसेवा करण्याकडे ओढले असले, तरी त्यांनी आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांची चौकट मोडली नाही, हे फार महत्त्वाचे आहे. समाजसेवा करतो म्हणजे आपण समाजावर काही उपकार करतो, या इतरत्र दिसत असलेल्या भावनेचा त्यांच्यात मागमूसही नाही. हे फार महत्त्वाचे आहे.
 
 
कर्नाटकातील हुबळी या निमशहरी गावातून त्या आल्या. त्या काळी, म्हणजे 1968 साली मुलींनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे म्हणजे निषिद्धच मानले जायचे. पण, सुधा (माहेरचे आडनाव कुळकर्णी) यांनी अभियांत्रिकीचेच शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. त्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला, तिथे 600 विद्यार्थी होते. त्यात 599 मुले आणि केवळ या एकट्या स्त्री! महाविद्यालयात महिलांसाठी वेगळे प्रसाधनगृह नव्हते. हे समजताच, अमिताभ बच्चन यांनी आश्चर्याने विचारले- काय? लेडिज टॉयलेट नव्हते? यावर सुधा मूर्ती सहजतेने सांगतात की, कसे असेल? कुणी मुलगी शिकायलाच येत नव्हती तर कशाला वेगळे टॉयलेट बांधतील? म्हणजे, समाजात एक स्त्री म्हणून संघर्ष केला असतानाही, समाजाप्रती राग िंकवा हीन भावना त्यांच्या मनात दिसली नाही. हा समाज जसा आहे तसा स्वीकारून, संघर्ष करीत आपल्याला पुढे जायचे आहे, असा संस्कार त्यांच्यावर होता आणि त्यांनी तो संस्कार न झिडकारता आपला संघर्ष चालू ठेवला आणि त्यात यशही मिळविले.
 
 
सुधा मूर्ती यांची संस्था महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमाभागातील देवदासींमध्ये कार्य करते. देवदासींच्या मुलींना नाईलाजाने या प्रथेत जाण्यापासून रोखणे, त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था करून, त्यांना या जाळ्यातून बाहेर काढणे व समाजात सन्मानाने प्रस्थापित करणे, इत्यादी कामे ही संस्था अत्यंत तळमळीने करीत आहे. परंतु, हे करताना समाजाला दूषणे नाहीत की समाजावर ओरखडे ओढणे नाही. एरवी आपण बघतोच की, समाजसेवा करणारे िंकवा स्वत:ला समाजसुधारक म्हणवून घेणारे, सतत समाजावर किती दुगाण्या झाडत असतात. समाजाला दोष देत असतात. समाजाची उणीदुणी काढत असतात. आम्ही समाजसेवा करीत आहोत िंकवा समाजाला ताळ्यावर आणत आहोत, याचा एक प्रकारचा अहंगंड त्यांच्या मनात असतो. समाजाचे मन या अशा दंशांनी विद्ध होत असते, याचे भान या कथित समाजसेवकांना नसते. सुधा मूर्ती यांच्या कार्यात हा असला प्रकार दिसत नाही. समाजाला कुठलेही दूषण न देता त्या आईच्या ममतेने कार्य करीत असतात. मुळात समाज हा चांगलाच होता. परंतु, कालांतराने तसेच काही कारणास्तव त्याच्यात काही दोष शिरले असतील, तर त्याचा उल्लेखही न करता, ते दोष हळुवारपणे काढणे आणि समाजाला पुन्हा एकदा त्याच्या स्वच्छ व निर्दोष स्वरूपात आणणे, या भावनेतून त्यांचे कार्य सुरू असल्याचे लक्षात येईल. समाजातील दोष दूर करणे, आपटून कपडे धुण्यासारखे नसते. ही अशी आदळआपट एरवी बहुतांश समाजसेवी व समाजसुधारकांमध्ये दिसते, ती सुधा मूर्ती यांच्यात दिसत नाही.
 
 
सुधा मूर्ती यांनी आपल्या जीवनप्रवासाचे जे काही वर्णन या कार्यक्रमात केले, त्यावरून त्या मुळातच बंडखोर वृत्तीच्या होत्या, असे लक्षात येते. परंतु, ही बंडखोर वृत्ती संस्कारयुक्त व शालीन होती. संत ज्ञानेश्वरही बंडखोर होते. संत एकनाथ, संत तुकारामही बंडखोर होते. तसे पाहिले तर प्रत्येक संत बंडखोरच असल्याचे आपल्याला दिसून येईल. परंतु, त्यांची बंडखोरी समाजमनावर ओरखडे ओढणारी नव्हती. स्वत: सर्व प्रकारचा अपमान, अवहेलना, छळ सहन करून या संतांनी समाजाला अमृतातच न्हाऊन काढले आहे. कविवर्य बी आपल्या ‘डंका’ या कवितेत म्हणतात-
 
या बड्या बंडवाल्यांत, ज्ञानेश्वर माने पहिला
मोठ्यांच्या सिद्धान्तांचा, घेतला पुरा पडताळा
कवी पुढे म्हणतात-
हिमतीने अपुल्या प्रांती, उत्क्रांती शांतिमय केली
प्रेमाच्या पायावरती, समतेची इमारत रचली।
 
चिखलाने बरबटलेल्या आपल्या मुलाला त्याची आई, त्याला न रागावता, तुसडेपणा न दाखवता, ज्या मायेने जवळ घेऊन त्याची स्वच्छता करते, तो भाव आपल्याला या सर्व संतांमध्ये दिसतो. खरेतर, हा त्यांचा स्थायीभाव असतो म्हणूनच ते संत असतात. सुधा मूर्ती यांच्या कार्यात, हे संतपण प्रकर्षाने दिसून येते.
 
प्रसिद्ध उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांनी त्यांना सांगितले होते की, तुमच्याकडे जे धन येते, ते तुमचे नसते. समाजाचे असते आणि ते पुन्हा समाजाला परत दिले पाहिजे. या भावनेतून सुधा मूर्ती नामक व्यक्ती आपल्याकडे आलेले धन हजार हातांनी समाजाला परत करीत आहे. ही परतफेड अधिकाधिक व्हावी म्हणून त्यांनी आपल्या वैयक्तिक गरजाही अत्यंत मर्यादित ठेवल्या आहेत. त्या सांगत होत्या- मी कधीही मेकअप करीत नाही (म्हणजे कधी केलाच नाही). चहा-कॉफीदेखील घेत नाही. अत्यंत साधेपणाने राहूनही, एखाद्या नक्षत्राप्रमाणे कसे लखलखत राहावे, ते सुधा मूर्ती यांच्याकडून शिकले पाहिजे. प्रचंड पैसा, संपत्ती हाताशी असूनही, ज्या व्रतस्थपणे, कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे त्यांनी आपले जीवन व्यतीत केले, त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर जे तेज, ओज आले आहे, त्याला तोड नाही. संत ज्ञानेश्वरांनी विठ्‌ठलाचे वर्णन करताना ‘तेज पुंजाळले’ शब्द वापरला आहे. सुधा मूर्ती यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर हे तेज पुंजाळलेले लक्षात येईल.
 
 
आजची प्रचलित समाजसेवा ज्या दिशेने जात आहे, ती निश्चितच स्पृहणीय नाही. काहीतरी हवे आहे, म्हणून समाजसेवा सुरू आहे. कुणाला आपला रिलिजन वाढवायचा आहे, कुणाला आयकरात सूट मिळवायची आहे, कुणाला इच्छा असो वा नसो, पण सरकारी कायदा पाळायचा आहे, कुणाला मानसन्मान, पुरस्कार मिळवायचे आहेत, म्हणून समाजसेवा सुरू आहे. या सर्वांनी आपण खर्‍या अर्थाने सेवाभावनेतून समाजाची सेवा करत आहोत का, याचा विचार करावा. त्यासाठी सुधा मूर्ती दीपस्तंभ ठरतील. कार्यक्रमाचा समारोप करताना अमिताभ बच्चन यांनी सुधा मूर्ती यांना, समाजाला काही संदेश देण्याची विनंती केली. काय सांगावे त्यांनी?
 
न त्वहं कामये राज्यं न स्वर्ग नापुनर्भवम्‌।
कामये दु:खतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम्‌।।
 
(मला राज्याची इच्छा नाही. मला स्वर्ग वा मोक्षही नको. माझी एकच इच्छा आहे- दु:खाने त्रस्त झालेल्या प्राणिमात्रांचे दु:ख नाहीसे करण्याचे सामर्थ्य मला द्या.)
 
शुकदेवांनी परीक्षिताला भरतवंशाचे वर्णन सांगताना रन्तिदेवाची थोरवी प्रकट करणारी कथा सांगितली. रन्तिदेव उदार असल्याने याचकांना दान देताना एक दिवस त्यालाच उपवास पडला. अशा रीतीने सतत एकूणपन्नास दिवस घडलेल्या उपवासाचे पारणे तो करणार एवढ्यात अतिथी देवरूपात आले. त्यांना आपल्याजवळचे सर्व अन्न रन्तिदेवाने देऊन टाकताच ते अतिथी देवरूपात प्रगटले व त्यास वर माग म्हणाले. तेव्हा रन्तिदेवाने मागितलेला हा वर, सर्वांनी आपल्या हृदयात कोरून ठेवण्यासारखा आहे. सुधा मूर्ती तर त्याचे प्रकटीकरण आहे.