राज्यातील सहा शैक्षणिक संस्थांना स्वच्छता रँकींग पुरस्कार

    दिनांक : 05-Dec-2019
दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने येथील एआयसीटीई सभागृहात आयोजित सभारंभात आज मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर. सुब्रमन्यम यांच्या हस्ते ‘स्वच्छता रँकींग पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्यातील सहा शैक्षणिक संस्थांना ‘स्वच्छता रँकींग’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये पहिले तीनही पुरस्कार राज्यातील महाविद्यालयांनी पटकाविले आहेत. यंदा पुरस्कार वितरणाचे हे तिसरे वर्ष होते.

h_1  H x W: 0 x 
 
देशभरात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने विविध कार्यक्रम मागील पाच वर्षात आखले आहेत. त्यापैकी ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमांतर्गत स्वच्छ शैक्षणिक परिसर ठेवण्याच्या उद्देशाने देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता रँकींग’ पुरस्कारामध्ये देशातील २७ विद्यापीठ आणि २० महाविद्यालयांना एकूण ८ श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील सिंबायोसिस आंरराष्ट्रीय विद्यापीठाला तिसऱ्या क्रमांकाचा तर याच शहरातील डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाला ९ व्या क्रमांकांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून मान्यता प्राप्त अनिवासी (विनावसतीगृह) महाविद्यालयांच्या श्रेणीत पहिले तीनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले. नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला दुसऱ्या क्रमांकाच्या तर पुण्यातील निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या श्रेणीत एकूण ५ महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशभरातील ६ हजार ९०० शैक्षणिक संस्था यात सहभागी झाल्या होत्या.