अखेरीस वॉटरग्रेसने जीपीएस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम मनपात केली सुरू

    दिनांक : 05-Dec-2019
 
जळगाव शहर महापालिकेच्या आ
 
तभा वृत्तसेवा
जळगाव, 
 
 गेल्या चार महिन्यांपासून सफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरगे्रस प्रोडक्टच्या कामाबाबत रोज तक्रारीचा पाऊस पडत आहे. याबाबत स्थायीसह महासभेत आणि आ. सुरेश भोळे यांनीही घेतलेल्या आढावा बैठकीत सदर हा मक्ता रद्द करण्याबाबत बराच खल करण्यात आला. मात्र प्रशासनाने करारातील अटी व शर्ती दाखवत मक्तेदाराला पाठीशी घालत कामात सुधारणा करण्यासाठी 1 महिन्यांची मुदत दिली होती. त्याबाबत मक्तेदारास अनेक नोटीसाही देण्यात आल्यात. अखेरीस मक्तेदार वॉटर ग्रेसने करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार अट क्रमांक 32 नुसार महापालिकेच्या आरोग्य विभागात घंटागाड्यांवर लावण्यात आलेली जी.पी.एस. व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम यंत्रणा बुधवारी कार्यान्वीत केली. मात्र 16 अटींचा भंग केल्याबद्दलचा पाच स्वतंत्र अहवाल संबंधितांनी तयार केला आहे.
 
करारनाम्यातील अट 1 नुसार ज्या भागात घंटागाडी जात नाही तेथे ढकलगाडी मनपाने उपलब्ध करून दिलेली असतांनाही तिचा उपयोग सुरु केलेला नाही. त्यानुसार दंडात्मक आकारणी करण्यात येणार आहे. अट क्र.2 नुसार शहरातील कचर्‍याचे स्पॉट उचलण्यासाठी पुरेसे मजूर, ट्रॅक्टर व वाहने कमी पुरविले आहे. यावर दोन फेर्‍या मारणार असल्याचा खुलासा मक्तेदाराने दिला आहे. अट क्र.5 नुसार घंटागाडी मार्गाचे, कचरा कंटेनरमधील कचरा उचलण्याचा सूक्ष्म नियोजन अहवाल सादर केलेला नाही. मात्र मक्तेदार असा आराखडा आरोग्य निरीक्षकांकडे दिला असल्याचे सांगत आहे.
 
अट क्र. 6 हॉटेल, मंगलकार्यालये, दुकान, भाजी बाजार येथील नियोजन सादर केलेले नाही. अट क्र. 10 मक्तेदाराने 30 दिवसात घंटागाड्यांचे संकलन मार्ग (रूट) सादर केलेले नाही. हा संकलन मार्ग आरोग्य निरिक्षकांकडे दिल्याचे मक्तेदार सांगत आहे. अट क्र.12 मक्तेदाराने यंत्र सामुग्री, मनुष्यबळ, पर्यवेक्षक स्टाफ यांची नावासह यादी, संपर्क क्रमांक, नियोजन व संख्या आणि कामगारांची प्रभाग निहाय बायोमॅट्रीक हजेरी पत्रक, वाहनांचे लॉग बुक तयार केलेले नाही. याबाबत बायोमॅट्रिक हजेरीऐवजी सेल्फी फोटो काढण्याची पळवाट मक्तेदाराने शोधली आहे.
अट क्र. 16 कचरा वाहतूक करतांना बंदिस्त किंवा ताडपत्रीने झाकणे गरजेचे असतांना काही वाहनांवरील कचरा ताडपत्रीने बंदिस्त केला जात नाही. तसा अहवालही दिलेला नाही. अट क्र.17 नुसार स्वतंत्र टोल फ्री क्रमांक आरोग्य विभागास दिलेला नाही. मात्र तो तयार करण्यात आला असून घंटागाडीवर व वॉर्डात लावण्यात येणार असल्याचे मक्तेदाराचे म्हणणे आहे. अट क्रमांक 19 वॉटरग्रेसच्या मुख्य कार्यालयासह प्रभागात कार्यालये सुरू करण्यात आलेली नाही. त्यांचे पत्ते, संपर्क क्रमांकही दिलेले नाही.
 
अट क्रमांक 22 नुसार ओला व सुका विलगीकृत कचर्‍याच्या वजनाची नोंद घेणेसाठी लॉग बुकची पूर्तता केलेली नाही.
अट क्रमांक 41 नुसार घंटागाडी, रिफ्युज कॉम्पॅक्टर व इतर वाहने आतून व बाहेरून पाण्याने स्वच्छ धुवून दुर्गंधीनाशक, किटकनाशकांची फवारणी करण्याबाबतचे अहवाल सादर करण्यात येत नाही. अट क्रमांक 41 ब नुसार कामगारांना गणवेश, गमबूट, हॅण्डग्लोज, मास्क, पावसाळ्यात रेनकोट दिल्याचा अहवाल दिलेला नाही.
अट क्र.10 नुसार कामगारांना दरमहा 10 तारखेपूर्वी वेतन बँकेतर्फे देण्याचे, पीएफ,ईएसआय, विमा देण्याचे बंधनकारक असतांना ते दिलेले नाही. याबाबत मक्तेदार पुढील महिन्यांपासून वेतन बँकेतर्फे देण्याचे आश्वासन देत
आहे.
 
नोटीसांचा धडाका
आलेल्या तक्रारी आणि अटी व नियमांचा केलेला भंग पाहता आरोग्य विभागाकडून मक्तेदारास नोटीसा आणि दंडात्मक कारवाई करण्याचा धडाका सुरु केला आहे. मात्र मक्तेदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असेही मनपा सूत्रांचे म्हणणे
आहे.
 
जीपीएस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित
 
बुधवारी मक्तेदार वॉटरग्रेसने महापालिकेच्या आठव्या मजल्यावरील आरोग्य विभागात घंटागाड्यांवर लावण्यात आलेल्या जीपीएस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वीत केली आहे. त्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. लॅपटॅपला ही यंत्रणा जोडली असून एका मोठ्या पडद्यावर ती दाखविली जात आहे. प्रत्येक वाहनाचे क्रमांक पर्यायी वाहनाचे क्रमांक यांचढी नोंद या यंत्रणेत आहे. हिंरवी गाडी म्हणजे कार्यरत तर लाल गाडी म्हणजे दुरूस्तीसाठी थांबलेली अशी यंत्रणा आहे. गाडी केव्हा आणि कोणत्या मार्गाने जात आहे, ते याव्दारे रेकॉर्ड होत दिसत असते.