जळगावात 7 व 8 डिसेंबरला रंगणार ‘पुरुषोत्तम करंडक’

    दिनांक : 05-Dec-2019
तभा वृत्तसेवा
जळगाव, 
 
येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव ही शैक्षणिक संस्था निव्वळ खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वतंत्र ओळख प्राप्त केलेली संस्था आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी आपला अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आणि के.सी.ई. सोसायटी संचलित आणि मु.जे. महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव पुरस्कृत कान्ह ललित कला केंद्र जळगावतर्फे पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2019 - 20 चे दि. 7 व 8 डिसेंबर रोजी होत आहे.
 
पुरुषोत्तम करंडकसारख्या महाराष्ट्रातील मानाच्या समजल्या जाणार्‍या स्पर्धेचे यंदा सलग चौथे वर्ष आहे. या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड या तिनही विद्यापीठातंर्गत असलेले महाविद्यालय सहभागी होतात.
  

l_1  H x W: 0 x 
 
महाविद्यालयीन रंगभूमीवरील हे मोठे व्यासपीठ देण्याचे कार्य खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी गेल्या दोन वर्षापासून करीत आहे. या स्पर्धा दि. 7 व 8 डिसेंबरला स्व.भैय्यासाहेब गंधे सभागृहात होत आहे. स्पर्धेत एकूण 8 संघांनी प्रवेश निश्चित केला आहे. 29 नोव्हेंबर गुरुवारी या स्पर्धेत सहभागी महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत मू.जे. महाविद्यालयात महाराष्ट्रीय कलोपासक पुणे यांचे प्रतिनिधी राजेंद्र नागरे आणि के.सी.ई.चे सदस्य चारुदत्त गोखले आणि सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे लॉट्स काढण्यात आले. सुरुवातीला पुण्याहून आलेले महाराष्ट्रीय कलोपासकचे प्रतिनिधी नांगरे यांनी पुरुषोत्तम करंडकाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. स्पर्धेच्या नियम व अटी संदर्भात सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. यानंतर स्पर्धेचे लॉट्स काढण्यात आले.
 
यात स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला दुपारी 2 वाजता उद्घाटन झाल्यानंतर दु.2.30 वाजता इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च शिरपूर यांचे ‘बायकोच्या नवर्‍याच्या बायकोचा खून’, दु.3.30 वाजता डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाची ‘इंट्रिेगेशन’, दु.4.30 वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाची ‘ईदी’ दु.5.30 वाजता कला, विज्ञान व पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ यांची ‘72 चे गणित’ या एकांकिका सादर होतील. 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांची ‘खेळ’, सकाळी 11 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद यांची ‘मॅट्रिक’, दुपारी 12 वाजता कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा यांची ‘रंगबावरी’ दुपारी 1 वाजता प्रताप महाविद्यालय अमळनेर यांची ‘असणं आणि नसणं’ ह्या एकांकिका सादर होणार आहे.
 
पारितोषिक वितरण 8 रोजी सायं. 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते होईल. लॉटस काढल्यानंतर के.सी.ई. सोसायटीचे सदस्य शशिकांत वडोदकर यांनी स्पर्धक संघांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. आयोजनासाठी के.सी.ई. चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
महाविद्यालयीन तरुण - तरुणी, शहरातील रंगकर्मी, नाट्यरसिकांनी उपस्थिती देत या स्पर्धेचा नाट्यानंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.