'अधीर'पणामुळे होते लोकांचे 'रंजन!'

    दिनांक : 05-Dec-2019
श्यामकांत जहागीरदार
 
विरोधी पक्षनेतेपद हे संसदीय लोकशाहीतील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. मग ते संसदेतील असो की राज्याच्या विधिमंडळातील. या पदावरील व्यक्तीने सरकारवर कडाडून टीका करणे समजण्यासारखे आहे. नव्हे, विरोधी पक्षनेत्याचे ते घटनात्मक कर्तव्यच म्हणावे लागेल. मात्र, सरकारवर टीका करताना ती औचित्याला धरून तसेच वस्तुनिष्ठ असली पाहिजे. ‘उचलली जीभ लावली टाळूला’ अशा प्रकारची टीका या पदावरील व्यक्तीला शोभणारी नसते. यातून संबंधित व्यक्तीच्या अधीरतेचे म्हणजे उतावीळपणाचे तसेच अप्रगल्भतेचे दर्शन घडते.
 

n_1  H x W: 0 x 
 
 
हे सारे सांगायचे कारण म्हणजे, लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी गेल्या काही दिवसांत उधळलेली मुक्ताफळे! एखाद्वेळ चौधरी असे बोलले असते, तर ते अनवधानाने बोलले असते, असे समजायला जागा होती. मात्र, एकसारखीच चूक माणूस सतत करीत असेल, तर त्याच्या एकूणच बुद्धिमत्तेबद्दल शंका येते. जी चूक त्यांच्या नेत्याने म्हणजे राहुल गांधी यांनी केली होती, तीच चूक आता चौधरी करीत आहेत. राहुल गांधी यांनी, पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख चोर असा केला होता. चौधरी आता मोदी आणि शाह यांचा उल्लेख घुसखोर असा करीत आहेत. मुळात आपण विरोधी पक्षनेते आहोत, असा समज चौधरी यांनी करून घेतलेला दिसतो. मात्र, आपण विरोधी पक्षनेते नाही, तर लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आहोत, याचे भान चौधरी यांनी ठेवायची गरज आहे. अधीररंजन चौधरी यांची गटनेतेपदी निवड करताना सोनिया गांधींसमोर मनीष तिवारी आणि शशी थरूर असे दोन पर्याय होते. मात्र, सोनिया गांधी यांनी या दोघांना डावलून अधीररंजन चौधरी यांची निवड केली.
 
कॉंग्रेस पक्षाला तर राहुल गांधी यांचीच गटनेतेपदी निवड करायची होती. मात्र, कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही, मिरवायचे मात्र गावभर, या वृत्तीमुळे ही जबाबदारी घ्यायला राहुल गांधी यांनी असमर्थता दाखवल्यामुळे नाईलाजाने कॉंग्रेस पक्षाला चौधरी यांची निवड करावी लागली. आता मात्र सोनिया गांधी यांना आपल्या निवडीचा निश्चितच पश्चात्ताप होत असेल. चौधरी विरोधी पक्षनेते होऊ शकतील एवढ्या जागाही कॉंग्रेस पक्ष लोकसभेत जिंकू शकला नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या फक्त 10 टक्के जागा िंजकाव्या लागतात. म्हणजे 545 सदस्यांच्या लोकसभेत फक्त 54 जागा कॉंग्रेस पक्षाने िंजकायला हव्या होत्या. मात्र, तेवढ्याही जागा कॉंग्रेस पक्ष िंजकू शकला नाही. त्यामुळे आपल्याला कशा पक्षाचे लोकसभेत प्र्रतिनिधित्व करावे लागत आहे, याची जाणीव चौधरी यांनी ठेवायला हवी होती. लोकसभेत नुसते वेडेवाकडे हातवारे करून आणि अडखळत भाषण केले म्हणजे आपण प्रभावी वक्ता ठरत नाही, याची जाणीव चौधरी यांनी नेहमीसाठी ठेवली पाहिजे. चौधरी यांनी सरकारवर वा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर टीका करायलाही कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. मात्र, चालू आठवड्यात चौधरी यांनी अतिशय बेजबाबदार टीका करून स्वत:चे हसे करून घेतले, सोबतच आपली लायकी दाखवून दिली.
 
राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरला (एनआरसी) विरोध करण्याचाही चौधरी यांना अधिकार आहे. एनआरसीत काही त्रुटी असतील, तर त्यात सुधारणा करण्यासाठी ते सरकारचे लक्ष वेधू शकतात. मात्र, एनआरसीवर टीका करण्याच्या नादात चौधरी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देशातील सर्वात मोठे घुसखोर असल्याचा आरोप केला. मोदी आणि शाह हे दोघेही गुजरात सोडून दिल्लीत आले, असा ‘भक्कम’ पुरावा त्यांनी दिला. चौधरी यांचा हा आरोप ऐकून हसावे की रडावे, ते समजत नाही. घुसखोर कुणाला म्हणावे, याचे तारतम्य चौधरी यांना नसेल तर त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्त करणार्‍याच्या आयक्यूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. चौधरी यांना साधा कॉमनसेन्स तर नाहीच नाही, पण भारतीय घटना तसेच घटनेने दिलेल्या सप्तस्वातंत्र्यांचीही माहिती नाही. देशाच्या एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्याचा या देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. कुणीही आपल्या राज्यातून शिक्षणासाठी, नोकरीसाठी, वैद्यकीय उपचारासाठी तसेच पर्यटनासाठी दुसर्‍या राज्यात जाऊ शकतो. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणार्‍याला घुसखोर म्हणत नाहीत, तर एका देशातून बेकायदेशीरपणे दुसर्‍या देशात वैध कागदपत्रांशिवाय प्रवेश करणार्‍या तसेच तेथे कायमस्वरूपी आश्रय घेतलेल्या व्यक्तीला घुसखोर म्हटले जाते. मात्र, एवढे साधे ज्ञानही चौधरी यांना नाही. त्यामुळे त्यांनी आधी इतिहासासोबत नागरिकशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. लोकसभेने याआधी अनेक अभ्यासू विरोधी पक्षनेते पाहिले. पण, चौधरी यांच्यासारखा ‘विद्वान’ विरोधी पक्षनेता प्रथमच पाहायला मिळाला. आतापर्यंत विरोधी पक्षनेता भाषणासाठी उभा राहिला तर सरकारी पक्षाच्या पोटात गोळा फिरू लागत असे. आज मात्र लोकसभेत चौधरी चौधरी भाषणासाठी अधीर झाले तर सदस्यांचे मनो‘रंजन’ होते. सत्ताधारी पक्षाऐवजी कॉंग्रेस पक्षच अडचणीत येतो. चौधरी आपले अधीर नाव प्रत्येक वेळी सार्थ करीत असतात. अधीरपणे बोलून लोकांचे रंजन करीत असतात.
 
चौधरी यांनी अधीरपणे बोलून स्वत:ला आणि पक्षाला अडचणीत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी आले असता, चौधरी यांनी काश्मीरचा मुद्दा हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचा दावा केला होता. त्यावेळी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीतच गृहमंत्री अमित शाह यांनी अधीररंजन चौधरी यांचा खरपूस समाचार घेत त्यांची बोलती बंद करून टाकली होती.
 
कार्पोरेट करातील कपातीमुळे देशाचे किती आर्थिक नुकसान झाले, हे सिद्ध करण्याच्या तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ या सर्वात अयशस्वी मंत्री आहेत, हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात अधीररंजन चौधरी यांनी निर्मला सीतारामन्‌ यांचा ‘निर्बला’ असा उल्लेख करीत आपली बौद्धिक दिवाळखोरी निघाल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. अनेक वेळा अधीररंजन चौधरी यांची सभागृहातील वागणूक पाहून सोनिया गांधी यांच्या चेहर्‍यावरील हावभाव ‘हेचि फळ काय मम तपाला’ यासारखे असतात. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा घुसखोर म्हणून, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांचा निर्बला म्हणून उल्लेख केल्याबद्दल भाजपा सदस्यांनी लोकसभेत अधीररंजन चौधरी यांच्या माफीची मागणी केली. पूनम महाजन आणि अन्य महिला सदस्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चौधरी यांनी माफी मागण्यास नकार देत आपले कोतेपण दाखवून दिले. आपल्या हातून चूक झाली असेल तर माफी मागण्यात काही कमीपणा नसतो. उलट, माफी मागितल्यामुळे माणसाच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. पण, हे अधीररंजन चौधरी यांना सांगणार कोण?
 
मोदी आणि अमित शाह घुसखोर नाहीत, तर सोनिया गांधी या देशातील सर्वात मोठ्या घुसखोर आहेत, असा आरोप भाजपा सदस्यांनी करताच चौधरी यांना मिरची झोंबली. सोनिया गांधी आणि गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढण्याच्या निर्णयामुळे चौधरी व्याकूळ झाले. लोकसभेतील अधीररंजन चौधरी यांची वागणूक ही विरोधी पक्षनेतेपदाला शोभणारी नाही. सुदैवाने चौधरी विरोधी पक्षनेते नाहीत, तर फक्त कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आहेत, हे देशवासीयांचे सुदैव म्हणावे लागेल. यामुळे चौधरी यांचे स्क्रू ढिले झाले असल्याची मार्मिक टीका हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली.
अधीररंजन चौधरी हे पश्चिम बंगालचे आहेत. पश्चिम बंगालचे राजकारणी स्वत:ला आक्रमक दाखवण्याच्या नादात स्वत:चे नेहमीच हसे करून घेत असतात. त्या मालिकेत आता अधीररंजन चौधरी यांचाही समावेश झाला आहे. अधीररंजन चौधरी यांची सभागृहातील एकूणच वागणूक पाहता ते फार काळ गटनेतेपदी राहतील, असे वाटत नाही. कारण, ते सरकारला कमी अन्‌ आपल्याच पक्षाला जास्त अडचणीत आणत असतात. त्यामुळे चौधरी यांच्या ‘अधीर’पणामुळे होते लोकांचे ‘रंजन’, असे म्हणावेसे वाटते!
 
9881717817