स्फुरण चढावं असं नवं काहीच नाही का?

    दिनांक : 04-Dec-2019
श्याम पेठकर
 
हा थेट प्रश्नच आहे. मग कुणीसे म्हणेल की, देवा प्रश्न का विचारता, उत्तरच द्या ना थेट! स्वातंत्र्यानंतर प्रश्नच पडणे बंद झाले आहे, असे वाटू लागले आहे. एकतर सगळेच आपले झाले. शासक आणि व्यवस्थाही आपलीच. त्यामुळे प्रश्न आपलेच आपल्यांना कसे विचारायचे, ही समाजाची धारणा झाली असावी. नंतर हळूहळू नव्या व्यवस्थेने पकड घेतली. कुठल्याच व्यवस्थेला प्रश्न विचारलेेले आवडत नाही. प्रश्न विचारण्याची क्षमता असलेली माणसेही आवडत नाहीत. मग व्यवस्था- अगदी ती कुटुंबव्यवस्थाही असो- तिथूनच प्रश्न न विचारणारी पिढी घडवायला सुरुवात करते. त्यासाठी रंजनात अडकविते. रंजनासाठी सर्जन हवे असते आणि सर्जनासाठी पुन्हा एक अस्वस्थता निर्माण व्हावी लागते. त्यासाठी पुन्हा प्रश्न पडण्याची गरज असते. म्हणून मग असे रंजन जे अस्वस्थ करणार नाही, त्यासाठी स्मरणरंजनात अडकविणे, हा सोपा मार्ग आहे. इतिहास आणि पुराणातील कहाण्यांचीच पेशकश केली जाते. आताही नेमके तेच होते आहे.


k_1  H x W: 0 x 
 
प्रत्येक पिढीची आपली एक भाषा असते. खरेतर भाषा दोनच आहेत या जगात. एक अध्यात्म आणि दुसरी विज्ञान. सध्या दोन्ही भाषा फारशा कुणाला अवगत आहे असे वाटत नाही. अगदीच अभावाने त्या सर्जनात दिसतात, मात्र अगदीच अभावाने. नव्या जगातील व्यवस्थांना विज्ञानाची भाषा नकोच असते. कारण, पुन्हा तेच... प्रश्न पडतात विज्ञानाच्या भाषेत. अध्यात्मातही प्रश्न पडतात, मात्र ती भाषा धर्म आणि कर्मकांड यांच्यात लपेटता येते. त्यात खर्‍या अर्थाने अध्यात्माचा जीव घुसमटतो, त्याकडे लक्ष देण्याची गरज नसते. म्हणून आताच्या जगाने समानतेची भाषा स्वीकारली आहे. अगदीच सवंगपणे बोलायचे तर स्वातंत्र्यानंतर आता तिसरी पिढी नांदायला लागली आहे आणि या पिढीच्या सर्जनाची भाषा ही मुद्रिताची नाही. ती दृश्यमानतेची आहे. तिला तंत्राची साथ आहे. मुद्रिताच्या भाषेतही तेच ते मांडले गेले. सोपा मार्ग निवडला गेला. ययातीपासून कर्णापर्यंत लिहिले गेले. ते अनावश्यक होते, असेही नाही. मात्र, त्यात नवे असे काहीच नव्हते. इतिहास सांगितलाच गेला पाहिजे. समजून घेतला गेला पाहिजे; पण... तोही प्रश्न पडूनच अभ्यासांती. आम्ही इतिहासाच्या पोथ्या करतो. व्यक्तींचे दैवतीकरण करतो आणि मग देवतांना प्रश्न विचारायचे नसतात. श्रद्धेला शंका मान्य नाही. म्हणून मग पुराणांनी ज्यांना खलनायक ठरविले ते खरेच तसे होते का आणि जे नायक होते त्यांचे सगळेच वागणे नायकाचेच होते का, हा प्रश्नच आम्हाला पडत नाही.
 
नवी भाषा तंत्राची आहे. माहितीचे तंत्र आहे. मुळात नव्याने असे काही घडतच नाही का जे आजच्या पिढीला सांगावे? सांगावे अशी नवता कल्पना, प्राज्ञेच्या पातळीवर उमलतच नाही का? मुद्रिताच्या भाषेत जे काय आम्ही लिहून ठेवले होते ते आता वाचनसंस्कृती लोप पावल्यावर दृश्यमानतेतही दाखविले जाते आहे.
 
आता पानिपतच्या लढ्यावर चित्रपट दाखल होतो आहे. मागोमाग अजय देवगणचा तानाजीवरचा चित्रपट येतो आहे. दोन टोकेच आहेत. एकदम गोलमाल रीटर्नसारखी फुहड विनोद किंवा मग पोर्नोग्राफिक विनोद ज्याला अगदी सेक्स कॉमेडी म्हणून आम्ही स्वीकारले आहे. ते दाखवायचे किंवा मग एकदम इतिहासात जायचे. पेशव्यांवरचा एक चित्रपट आला नि त्याची चर्चा झाली. मग पद्मावती आला. आता हे असे विकले जाते म्हटल्यावर तेच ते सुरू होते. एकाने सोयाबीन लावले तर सार्‍या गावाचे शेतकरी सोयाबीनचाच पेरा करतात, तसेच हेही. टीव्हीवरच्या मालिकांतूनही पुराणकथा किंवा हा असला इतिहास यापलीकडे वेगळे म्हणून असे काही दाखविण्याचीच इच्छा होत नाही. ‘मार्केट यही मांगता हैं,’ असेच सांगितले जाते. आता वर्षाला दोन असे ऐतिहासिक चित्रपट अगदी भव्यदिव्य खर्च करून येतात. त्यात कलात्मक असे काहीही नसते. कथानक मांडतानाही व्हीएफएक्स तंत्राचेच सारे श्रेय असते. चर्चाही भव्य आणि खर्चिक सेटस्‌ची आणि नायिकांच्या दागिने अन्‌ कपड्यांची. तानाजी म्हणून अजय देवगण नाचतो. त्याचा नाच रणबीर िंसगच्या पेशव्यांपेक्षा वेगळा आहे का, यावरच चर्चा. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कथानकांमध्येही तडजोडी केल्या जातात. पुढच्या काळाचा विचार करता भविष्यातले असे काही वेगळे दाखविण्याचा विचारच केला जात नाही का? टीव्हीवरच्या मालिका एकतर अशा पौराणिक आणि ऐतिहासिक असतात. रामायण, महाभारतच दाखवायचे, पण मग ते वेगळ्या नावाने. ‘कहानी द्रौपदी की’ म्हणत पुन्हा महाभारतच दाखवायचे. कथेच्या पातळीवर तुम्ही नवे काय संशोधन करणार? इतिहासाच्या बाबतही हे असेच. एखादे पात्र घ्यायचे आणि त्याच्या नावाने तोच काळ, तोच नायक दाखवायचा. नवतेचा शोध घेण्याची क्षमताच आता यामुळे संपत येईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे.
 
नव्या तंत्राने आमचे जीवनच व्यापून टाकले आहे, तर मग त्या बदलल्या जीवनाची कथा सांगाविशी वाटत नाही का? तसले प्रयत्न होतच नाहीत, असे नाही. मध्यंतरी अक्षय कुमारचा मंगळवारीचा चित्रपट आला होता. मात्र, त्यातही पुन्हा चित्रपटमाध्यमाचे स्वातंत्र्य घेत आणि बाजाराचा विचार करून अवैज्ञानिक असेच बरेचसे दाखविले गेले होते. तुम्ही ज्या भाषेत बोलत असता त्याच्याशी प्रामाणिक तर असा ना! विज्ञानाच्या भाषेत बोलत असताना तद्दन गल्लाभरू असे काही दाखवू नका. स्पेस सेंटरमध्ये दणक्यात नाच दाखविण्याला काय म्हणायचे?
 
नवे प्रयोग केलेच जात नाहीत, असे नाही. मात्र, त्यातच बाजारू तडजोडी केल्या जातात. सवंगपणे मांडणी होते. मध्यंतरी, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक आले होते. विषय आजचा आणि वेगळा होता. मात्र, लेखन आणि मांडणीतही बाजाराला काय चालेल, याचा विचार केला गेला आणि त्यातले वास्तव क्षीण झाले. आता स्टार प्रवाहवर बाबासाहेब आंबेडकरांवरची मालिका सुरू आहे. त्यात वास्तव अत्यंत संयतपणे मांडले जाते आहे. असे वेगळे काही प्रयोग होतात; पण ते अगदी तितकेच असतात.
 
आता पडदाही बदलला आहे. मोठा आणि छोटा पडदा ओलांडून आता वेबचा पडदा आला आहे. त्यातही भडक असेच काही दाखविण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला. खुलेपणाच्या नावाखाली भडक असा सेक्सच दाखविला पाहिजे, असा काहीसा गैरसमज दिसून येत होता. तरीही वेब सीरिज किंवा चित्रपट काही वेगळे आणि नव्या जगाचे नवे असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. ते विकलेही जात आहे. जगाची बाजारपेठ आहे त्याला. याचा अर्थ आतावर छोटा आणि मोठा पडद्याचे दुकानदार जे सांगत होते की, ‘पब्लिकला हेच हवे आहे, तेच लिहा, दाखवा’ तसे काहीही नाही. नेटफ्लिक्सवर रवींद्रनाथ टागोरांच्या कथांची मालिका चांगली मांडली गेली आहे. आजच्या काळातही बोल्ड अशी संभावना केली जावी, असे विषय टागोरांनी अत्यंत संयतपणे लिहिले आणि या मालिकेतही ते दाखविले गेले. ‘पार्टिशन-1947’ हा फाळणीवरचा चित्रपट पाहताना कुठेही आधुनिक तंत्रशरणता नसतानाही दृश्यात्मकता खूप प्रभावी झालेली आहे. ऐतिहासिक सत्यही विनाओरखडा मांडले गेले आहे.
 
हे असे एकीकडे असताना दुसरीकडे मात्र तेच ते दळण दळले जात आहे. हे मासचे आहे आणि हे क्लासचे आहे, अशी विभागणी बाजारातल्या दलालांनी केलेली आहे. कला व्यावसायिक असावी, मात्र ती इतकी बाजारशरण नसावी. त्यात दलाल नसावेत. ते मग तुम्हाला एकुणातच व्यवस्थेला जे हवे तेच विकतात. हेच खपते, असेही सांगतात. साडीतली नायिका आणि जीन्स पँटमधली खलनायिका- व्हँपच दाखविली जाते. नवे असे अभिजात लिहिले जात नाही की लिहिले जाते; पण ते आजच्या कला व्यवसायाला नको आहे? गेल्या सात-आठ दशकांत नवे नायक घडलेच नाहीत का? अगदी नायक म्हणून लक्षच गेले नाही आमचे अशी खूपसारी माणसे आपले काम करत आहेत, त्यांचीही मालिका होऊ शकते. मतीन भोसले, रामभाऊ इंगोलेंपासून कितीतरी अशी उदाहरणे आहेत. शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर आहे, त्याचा स्वीकार करण्याची कुवत बाजारात नाही!