घुसखोर आणि शरणार्थी

    दिनांक : 04-Dec-2019
राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि पुढील पाच वर्षांनंतर या देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याची केंद्रीय गृहमंत्र्याची हमी, ऊर अभिमानानं भरून यावा अशी आहे. पण, सार्‍याच बाबी राजकीय चष्म्यातून बघण्याची, जाती-धर्माच्या चाळणीतून चाळण्याची सवय जडलेल्या राजकारण्यांना त्यातील भल्याचा निचोड काढता येईल कसा? परिणाम हा की, देशहिताच्या या उपक्रमाविरुद्ध तुणतुणे वाजविणे त्यांनी सुरू ठेवले आहे. ज्या देशाची फाळणी नेहरू-गांधींसह संपूर्ण कॉंग्रेसच्या सहमतीने धर्माच्या आधारे झाली, त्याच देशात तीच कॉंग्रेस भविष्यात घुसखोरी रोखण्याच्या मोहिमेला धर्माचा आधार देण्यास नकार देते, यासारखा विनोद दुसरा असू शकत नाही. अमेरिकेपासून तर चीनपर्यंत अन्‌ युरोपपासून तर रशियापर्यंत, जगाच्या पाठीवर कुठलाच असा देश नाही, जो सीमेपलीकडून होणारी घुसखोरी मान्य करेल. सर्वांनी आपापल्या परीने त्यावरील उपाय योजले आहेत. कठोरातील कठोर असे कायदे तयार केले आहेत. आपल्याकडे कालपरवा चर्चेत आलेली एनआरसी मोहीम त्यांच्याकडे वर्षानुवर्षे प्रचलनात आहे. प्रत्येक देशाचे नैसर्गिक भौगोलिक क्षेत्र आहे. लोकसंख्या आहे. साधन-संसाधनं आहेत. निसर्गसंपदा आहे. त्यावर त्याच देशाच्या नागरिकांचा हक्क प्रथमत: मान्य केला पाहिजे. तसा तो केलाही जातो. इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यासाठी उचललेले पाऊल आणि त्यातून घडून आलेली बांगलादेशची निर्मिती, हा फक्त आणि फक्त घुसखोरांचे लोढणे दूर सारण्यासाठी योजलेला उपाय होता. ती काही मुस्लिमांविरुद्धची कारवाई नव्हती. ‘बाहेरून आलेल्यांचे’ ओझे सांभाळणे आता भारताला शक्य होणार नाही, असाच निरोप त्यांनी सार्‍या जगाला या मोहिमेपूर्वी धाडला होता. बहुधा त्यामुळेच की काय, पण हे पाऊल उचलण्यामागील भारताची अपरिहार्यता उर्वरित जगाला उमगली होती. जे तेव्हा ‘मुस्लिमविरोधी’ ठरले नाही, तेच पाऊल आज मात्र धर्माच्या तराजूत तोलण्याचा प्रयत्न म्हणूनच लाजिरवाणा ठरतो.

j_1  H x W: 0 x 
 
स्वत:चा देश सोडून जेव्हा लोक इतरत्र आसरा शोधण्याचा प्रयत्न करतात आणि अवैध रीत्या तिथे ठाव मांडतात, तेव्हा बहुतांश प्रकरणी कारणं रोजगार, असुरक्षितता, गरिबी अशीच असतात. आज सर्वाधिक घुसखोर बांगलादेशातून भारतात येतात. नाही म्हणायला पाकिस्तान, अफगाणिस्तानातूनही ते येतात. पण, बांगलादेशातून येणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेषत: पूर्वांचलातील राज्यांमध्ये तर त्यांचा अक्षरश: धुडगूस आहे. तत्कालीन राज्यकर्त्यांना त्यांच्यात ‘मतदार’ दिसल्याने आणि भारताचे हित त्यांच्यालेखी कवडीमोल ठरल्याने घुसखोरांसाठी पायघड्या अंथरण्याचे काम त्यांनी केले. रेशनकार्डपासून तर मतदार यादीतील त्यांच्या समावेशापर्यंतच्या बाबीही या घुसखोरांना कुणाच्यातरी राजकीय आकांक्षेपायी उपलब्ध झाल्यात. माणुसकीच्या आडून त्याचे अकारण समर्थनही झाले. यातून आमच्या देशातील मूळ नागरिकांवर आपण अन्याय करीत असल्याची, त्यांच्या हक्कांवर गदा आणत असल्याची जाणीवही कुणाला झाली नाही. याचा परिणाम असा झाला की, अनेक ठिकाणी घुसखोर मुजोर झाले. स्थानिकांवर अधिकार गाजवू लागले. राजकारण्यांवर दबाव टाकू लागले. त्यातलेच काही लोक राजकीय आखाड्यात उतरून शिरजोर झाले अन्‌ मग, आपल्याच देशात माना खाली घालून, गुमान राहण्याची वेळ स्थानिकांवर आली. याची स्वाभाविक खदखद लोकांच्या मनात होतीच. केवळ, ती खदखद शांत करण्यासाठी म्हणून नव्हे, तर राष्ट्रहिताचा एक निर्णय म्हणून केंद्र सरकारने, वैश्विक स्तरावर सर्वदूर अस्तित्वात असलेल्या एनआरसी मोहिमेची अंमलजावणी भारतात करण्याचा निर्णय घेतला. आसामात त्याचे चांगले परिणामही दिसताहेत. आता देशभरात त्याचा विस्तार करण्याचा निर्धार गृहमंत्री व्यक्त करताहेत. देशाच्या कानाकोपर्‍यातून घुसखोर हुडकून बाहेर काढण्याचा मानस जाहीर करताहेत, तर यात विरोध करण्यासारखं काय आहे? पंधरवड्यापूर्वी अमेरिकेत अवैध रीत्या राहण्याचा प्रयत्न करणार्‍या सुमारे पाचशे भारतीयांना त्या देशाने परत पाठविले. कोणताच देश अशी घुसखोरी सहन करीत नाही, हा त्याचा सरळ अर्थ. मग तीच बाब सहन करण्याची भूमिका इथल्या सरकारनं घ्यावी, असा दुराग्रह कशासाठी?
 
संबंधित नागरिकाचे नाव व इतर माहिती संकलित करणारी ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली ती आसामपासून. खरंतर पहिल्या जनगणनेपूर्वी अशीच मोहीम राबविण्यात आली होती. फक्त नंतरच्या काळात त्याची दुरुस्ती झाली नाही. आता संपूर्ण देशभरात ही मोहीम राबविली जायची आहे. 1951च्या यादीत समाविष्ट असलेल्या कुटुंबांची नावं हा ‘मूळ नागरिक’ शोधण्याचा सरळ साधा उपाय. कोण घुसखोर आणि कोण मूळ रहिवाशी, हे त्यातून स्पष्ट होणार आहे. जे आसामात तेच देशभरात. मुंबईपासून तर चेन्नईपर्यंत कोण कोण कुठे कुठे दबा धरून बसले आहे, ते स्पष्ट होईल या निमित्ताने. लोक तर पाकिस्तानातूनही आलेत इथे. अजूनही येतात. पण, तिथून येणारे लोक मुळात या देशातले आहेत. हिंदू , शीख, जैन, बौद्ध, पारशी अशा सर्वांचाच त्यात समावेश आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आश्रयासाठी भारतात येणार्‍यांमध्ये काही ख्रिस्ती बांधवांचाही समावेश आहे. सरकारने या सर्वांची गणती शरणार्थींमध्ये केली आहे. प्रामुख्याने तिथे होणारा अन्याय आणि विपरीत सामाजिक स्थितीमुळे, तिथे मिळणार्‍या दुय्यम वागणुकीमुळे ते भारतात येतात. हा देश त्यांना ‘आपला’ वाटतो. येतानाही ते शरणार्थींच्याच भूमिकेत असतात. सीमेपलीकडून येणार्‍या बांगलादेशींसारखी मुजोरी करीत नाहीत ते. उर्वरितांवर हावी होण्याचा प्रयत्नही नसतो त्यांचा. त्यांच्या इथे येण्याची महत्त्वाची कारणं तिथल्या बेरोजगारीत, गरिबीत दडलेली असतात. शिवाय पाकिस्तानातून येणार्‍या हिंदू , बौद्ध, शीख, पारशींना भारताशिवाय कोणता देश स्वीकारणार आहे? मुस्लिमांसाठी मात्र अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे, तर जिथून ते आलेत तो देशही मुस्लिम म्हणूनच त्यांनी हक्काने भांडून घेतलेला आहे. भारताच्या परवानगीविना त्यांचे इथे येणे ही म्हणूनच सरळ सरळ घुसखोरी ठरते. शरणार्थी अन्‌ घुसखोर यांना समान न्याय लावला जाऊ शकत नाही.
 
सन 2000 मध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या दीड कोटींच्या घरात मान्य करण्यात आली होती. त्याच वेळी हेही स्पष्ट करण्यात आले होते की, वर्षाकाठी निदान तीन लक्ष लोक तिथून विनासायास येतात. काही सरळ सीमा ओलांडून येतात. काही पर्यटनाच्या निमित्ताने येतात अन्‌ मग इथेच घरठाव करतात. पूर्वांचलातील राज्ये, पश्चिम बंगालात त्यांना कालपर्यंत राजाश्रय मिळाला. आजही मिळतोय्‌. जराकुठे एनआरसीची मोहीम आरंभावी, तर ममतादीदींना उठणारा पोटशूळ राजकीयदृष्ट्या बराच बोलका आहे. 2004 मध्ये या प्रांतात राहणार्‍या बांगलादेशी घुसखोरांची संख्या 57 लक्ष एवढी होती. ती आता 2.4 कोटींवर पोहोचली आहे. मिझोरम, दिल्लीत राहणार्‍या बर्मावासीयांपासून तर आसाम, बंगाल आणि काश्मिरात अवैध रीत्या राहणार्‍या रोिंहग्यांपर्यंत लाखांच्या घरात हे मुजोर पाहुणे भारतात ठाण मांडून बसले आहेत. ते इथल्या मूळ नागरिकांच्या अधिकारांत वाटेकरी झाले आहेत. ते इथल्या साधन-संसाधनांवर हक्क सांगू लागले आहेत. त्याबद्दलची चीड आहे भारतीयांच्या मनात. तरीही काही लोक राजकारणापलीकडे या समस्येचे गांभीर्य लक्षात घ्यायला तयार नाहीत. त्यांच्या पेकाटात लाथ हाणूनच या समस्येचे उत्तर शोधावे लागणार आहे. भारताचे गृहमंत्री तेच करायला निघाले आहेत...