घटनाबाह्य सत्ताकेंद्र तयार करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न- माधव भंडारी

    दिनांक : 04-Dec-2019
मुंबई: राज्य सरकारच्या काल मंगळवार रोजी झालेल्या बैठकीत उपस्थितांवरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार मंत्री मंडळाच्या बैठकीत मंत्री नसलेल्या लोकांना का परवानगी देत आहे? असा सवाल उपस्थित करत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सरकारवर हल्ला चढविला आहे. सरकार घटनाबाह्य सत्ताकेंद्र तयार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
 
h_1  H x W: 0 x
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेत काल ३ डिसेंबर रोजी राज्य सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत वरून सरदेसाई उपस्थित होते. वरून सरदेसाई यांच्याकडे कोणतेही मंत्रिपद नसताना ते बैठकीत काय करत होते असा सवाल नेटकर्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही यास विरोध दर्शवत बिगर मंत्री असलेल्यांची बैठकीत उपस्थिती कश्यासाठी? असा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री मंडळाच्या बैठकींचे काही शिष्टाचार असतात, त्यांचे पालन व्हायला हवे असेही त्यांनी म्हंटले होते.
 
माधव भंडारी म्हणाले, राज्य सरकार नियमांना व राजकीय शिष्टाचाराना तिलांजली देत असून मंत्रि नसलेल्या व्यक्तीला बैठकीत बसवण्याची हि ऐतिहासिक घटना आहे. अशी घटना राज्याच्या इतिहासात क्वचितच घडली असेल. मंत्री नसलेल्या व्यक्तीला बैठकीत बसवण्याचे काही निकष असतात. जे निर्णय घ्यायचे आहेत त्या संबंधीचे जाणकार अभ्यासक बैठकीला बोलावले जातात. परंतु, सरकार अश्या कोणत्या कारणासाठी या लोकांना बैठकित बसू देत आहे हे स्पष्ट केले पाहिजे असे त्यांनी म्हंटले आहे.