भीती न बाळगता स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या : प्रा. राहुल त्रिवेदी

    दिनांक : 04-Dec-2019
जळगाव: विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की दहावीनंतर आपल्याला करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बऱ्याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल जाणून घेणं आवश्यक आहे. आपल्याला कुठल्या विषयात करिअर करायचं आहे, हे समजून घ्या. तसंच यात विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणंही महत्त्वाचं आहे. असा सल्ला करिअर कौन्सिलर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी विध्यार्थ्यांना दिला, दहावीनंतर पुढे काय? या विषयावरील कार्यशाळा शहरातील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयामध्ये घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

ज_1  H x W: 0 x 
 
प्रा. राहुल त्रिवेदी पुढे म्हणाले,पालकांनीही विद्यार्थ्यांमधल्या क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता त्याला एखाद्या शाखेकडे ढकलणं साफ चुकीचं आहे. पालकांनी आपल्या आवडींचा व अपेक्षांचा त्यांच्यावर दबाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनीच डॉक्टर, इंजिनीअरिंगचा अट्टाहास ठेवू नका. विध्यार्थ्यानी पालकांशी मैत्रीचं नातं निर्माण करायला हवं. असा पालकांनाही सल्ला दिला.
व्यावसायिक बना...
करिअरमध्ये तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. पण फक्त नोकरी करण्याच्या विचाराने त्याकडे पाहू नका. स्वतःचा बिझनेस उभा करण्याकडेही कल असू द्या. दहावीनंतर कॉलेजबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध बिझनेस हाऊसेस, इंडस्ट्री, फर्म्स, मीडिया हाऊसेसमध्ये पार्टटाइम नोकरी किंवा इंटर्नशिप करावी. आजच्या स्पर्धेच्या युगात थिअरीबरोबरच प्रॅक्टिकलदेखील महत्वाचं आहे. विद्यार्थी नेहमी लोकप्रिय किंवा ऐकायला छान वाटणाऱ्या कोर्सकडे धाव घेतात. मग त्या कोर्समधून कशीबशी हजारो मुलं उत्तीर्ण होतात. पण त्यातली अनेकजण बेरोजगारच राहतात. याउलट तुमची आवड, बौद्धिक क्षमता, कल यांची योग्य सांगड घालून निर्णय घ्या आणि आपलं करिअर निवडून यशस्वी व्हा! असा मंत्र त्यांनी यावेळी दिला.
या कार्यशाळेला शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत प्रा. सोनल तिवारी यांनी सूत्रचालन करून आभार मानले. तर आयोजनासाठी प्रा. पल्लवी भालेराव, प्रा. उज्वला मालुसरे, प्रा. शितल किनगे, प्रा. यामिनी जोशी, प्रा. सोनल तिवारी, प्रा. राखी वाघ, प्रा. शुभांगी अहिरे, प्रा. अनिल सोनार, प्रा. संदीप पाटील आणि प्रा. संतोष मिसळ यांनी सहकार्य केले.