कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी भिडे गुरुजींची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

    दिनांक : 04-Dec-2019
मुंबई: भीमा कोरेगांव प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी केले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यास लाखोंची उपस्थिती होती. यावेळी दंगल उफाळल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ह_1  H x W: 0 x 
 
 
महाविकास आघाडी सरकारकडून भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात येतील असे विधान मंत्री नितीन राऊत यांनी केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे व आमदार प्रकाश गजभिये यांनीही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जमावावर दगडफेक झाली होती. या घटनेचे राज्यभरात हिंसक पडसाद उमटले होते. दरम्यान राहुल फटांगडे यान तरुणाची संतप्त जमावाकडून हत्या झाली होती. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे ठाकरे सरकार इतक्या तातडीने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात अनिता साळवे या महिलेच्या तक्रारीवरून भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी आदी आरोपी आहेत. एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. मात्र भिडे गुरुजींवर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते हे महत्वाचे ठरणार आहे.