कर्जमाफीचा शासन आदेश म्हणजे विश्वासघाताची परिसीमा - बबनराव चौधरींची सरकारवर टीका

    दिनांक : 31-Dec-2019
शिरपूर : वर्षभरात आधी दुष्काळ, महापूर आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे राज्यातल्या शेतकर्‍याचे भयंकर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी व्हावी अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे यांनी शेतकर्‍यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील चिंता थोडी कमी झाली होती. परंतु हा आनंद क्षणिक ठरला आहे. कारण ही शेतकरी कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांची फसवणूक आहे असे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

j_1  H x W: 0 x 
 
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेचा शासनादेश २७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१५ नंतर ज्या शेतकर्‍यांनी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतले असेल त्या शेतकर्‍यांचे ते पीक कर्ज पुनर्गठित करुन सुद्धा सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असेल, तर त्यांना दोन लाखापर्यंत थेट खात्यात मदत देण्यात येणार आहे. याचा अर्थ एप्रिल २०१५ पूर्वी ज्यांचे कर्ज असेल त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला नाही. म्हणजेच त्यांना कर्जमाफी मिळणार नाही.
या शासन आदेशामध्ये क्रमांक पाच वर स्पष्टपणे एक गोष्ट नमूद केली आहे, ज्या शेतकर्‍यांचे पीक कर्ज मुद्दल व व्याजासह दोन लाखांपेक्षा अधिक झाले असेल त्यांना या पीक कर्जमाफी मध्ये लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी शासनावर संतापले आहेत. शेतकरी कर्जमाफी बाबत काढण्यात आलेला शासनादेश म्हणजे विश्वासघाताची परिसीमा आहे. शेतकर्‍यांना क्रूरपणे फसवले आहे. असे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी नमुद केले आहे. शासन आदेशाच्या पाचव्या कलमानुसार व्याज व मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आले आहे. मागील कर्जमाफीत अशा शेतकर्‍यांसाठी एक रक्कमी परतफेड योजने अंतर्गत दीड लाखाची कर्जमाफी देण्यात आली होती.
नव्या योजनेत दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना सरसकट अपात्र करण्यात आले आहे. राज्यात बहुतांश शेतकर्‍यांच्या डोक्यावर दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने लाखो शेतकरी पहिल्याच अटीत अपात्र ठरवण्यात आले आहेत. सरकारने हा शासनादेश त्वरित मागे घेवुन शेतकर्‍यांना दिलेल्या शब्दा प्रमाणे विना अट शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली आहे.