तुझे आहे तुजपाशी, पण जागा चुकलाशी...!

    दिनांक : 03-Dec-2019
मुंबई वार्तापत्र 
 
नागेश दाचेवार
 
आपले अनैतिक संबंध कसे नैतिक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी, अनैतिक कृत्य करणार्‍यांकडून वाटेल ते दाखले आणि वाटेल तो संदर्भ देऊन, तो कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. वर्षानुवर्षे असेच चालत आले आहे. राज्यातील राजकारणातली परिस्थिती काहीशी अशीच झालेली दिसते. राजकीय अनैतिकतेचा कळस यावेळी गाठला गेला असल्याने, आपण केलेल्या अनैतिक कृत्यांवर पांघरुण घालण्याचा प्रकार आता, निवडणूकपूर्व करार पायदळी तुडवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमवेत नव्या घरोब्याच्या आणाभाका घेणार्‍या शिवसेनेकडून केला जात असल्याचे पुढे आले आहे. आता िंहदुत्वाला तिलांजली देताना, नैतिकतेलाही तिलांजली देताना ही मंडळी दिसत आहेत. तुमच्या या कृतीनंतर आता, दुसर्‍याकडे बोट दाखविण्याचा िंकवा नैतिकता शिकविण्याचा अधिकार तुम्हाला राहिला नाही. हिंदुत्वाच्या आणाभाका खाताना, असंगाशी संग केल्यानंतर, ‘तुझे आहे तुझपाशी, पण जागा चुकलाशी...!’ अशीच तुमची गत झाली आहे.
 
 

जज _1  H x W: 0
 
आता थोडं अवघडल्यासारखं वाटतंय्‌. पण, यात त्यांची काही चूक नसल्याने स्वर्गीय बाळासाहेबांना िंहदुहृदयसम्राट म्हणतोय्‌. आमच्या नजरेत िंहदुहृदयसम्राट ते होते, आहेत आणि राहतील देखील. तुम्ही त्यांची उपाधी हिरावून घेण्यासारखी खालची पातळी गाठली असली, तरी त्यांनी ती उपाधी आपल्या जिवावर मिळवली असून, यात तुमचा खारीचाही वाटा नव्हता, एवढे मात्र यानिमित्ताने अधोरेखित करावेसे वाटते. जेव्हा कुणी शिकत होते, तर कुणी इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यालयात गठ्ठे बांधत होते, तेव्हा साहेब मुंबईवर अधिराज्य गाजवत होते. त्यामुळे ते आज नसल्याने त्यांच्या नावाचा वापर नव्हे, गैरवापर करून तुम्ही जे चाळे चालवलेत ना, ते तुम्हाला लखलाभ असोत. मात्र, ज्याच्या जिवावर आपण उडत आहोत, त्यांचा सन्मान करू शकत नसला, तर किमान अवमान तेवढा करू नका. कारण, साहेबांच्या नावाचे वलय असल्याने आज तुम्हाला चार लोक विचारत आहेत. नाहीतर आपले काय योगदान आहे, याकडे जरा मागे वळून बघितल्यास तुम्हाला तुमची पत आणि योग्यता काय ते लक्षात येईल.
सत्तेसाठी वाट्टेल ते करताना, लाचारी पत्करताना किमान आपण ज्या छत्रपतींच्या नावाचा वापर करून राजकारण करता, ज्या शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या आणाभाका घेता, त्यांनी आपल्या हयातीत- उभ्या आयुष्यात कधीही लाचारी पत्करली नव्हती. हा इतिहास जर औरंगजेब, अफजल खान आणि शाहिस्तेखानाचा इतिहास तोंडपाठ ठेवणार्‍यांना माहीत नसेल तर नवलच आहे. स्वतः सत्तेसाठी खालची पातळी गाठायची आणि वरून खर्‍या अर्थाने स्वाभिमान जपणार्‍यांना स्वतःच स्वाभिमानाचे बाळकडू पाजण्याचा प्रयत्न करायचा, तुमचा हा ढोंगीपणाचा बुरखा आता टराटरा फाटला आहे.
 
कर्जमाफी नाही कर्जमुक्ती!
 
भाजपासोबतच्या मागच्या सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसून सत्तेचा उपभोग घेताना, दुसरीकडे कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती देण्याची मागणी वारंवार तुम्ही करत आलात. ती गोष्ट वेगळी आहे की, ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले जातात तेथे तुमचे प्रतिनिधी ‘ब्र’देखील काढत नव्हते. त्यानंतर बाहेर मात्र पक्षप्रमुख आणि त्यांनी ठेवलेला दवंड्या सातत्याने दवंडी पिटत फिरायचे. मागील पाच वर्षांत यांनी ऊर बडवून पिटवलेल्या दवंड्यांची संख्या भरपूर आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईपोटी 10 हजार रुपये शासनाने मंजूर केले, तर 25 हजार रुपये देण्याची मागणी यांच्याकडून रेटली गेली. आता यामागचा त्यांचा हेतू काय होता? विरोधासाठी म्हणून विरोध होता की राजकारण होते, हे त्यांचे तेच जाणे. मात्र, आज याच दवंडी पिटणार्‍यांच्या हातात सरकार आहे. तुम्ही क्षणात कोणताही निर्णय घेऊ शकता. वरकरणी तरी सामान्य जनतेला असेच वाटत आहे. आता सूत्रं दुसरं कुणी हलवत असेल, तुमची दोरी िंकवा अलीकडल्या तंत्रज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाल्यास रिमोट कंट्रोल जर दुसर्‍या कुणाच्या हाती असेल तर असा अपवाद वगळता. आमच्या भाबळ्या भावनेनुसार, आता तुम्हीच आमचे सरकार आणि मायबाप आहात...
 
सत्तेत मागेही होते तेव्हाही तुम्ही तीच री ओढत होते आणि आताही तुम्ही तीच री ओढताना दिसत आहात. तुमच्या भूमिकेत बदल हवा. आता तुम्हाला कारणं देऊन चालणार नाही. राज्यात बदलाचे वारे आहेत, राज्यातील जनतेला बदल हवा आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणातला नवा बदल आम्ही केला आहे. ही सर्व पोपटपंची गेले महिनाभर ऐकून ऐकून आमचे कान पिकले. आता काय ठोस निर्णय िंकवा पाऊल टाकलेले बघायचे आहे. राज्यातील जनतेला आणि विशेषत्वाने बळीराजाला तुमच्याकडून फार आस लागली असताना, तुमची भाषा आता बदललेली दिसत आहे. काय म्हणताहेत तुम्ही, पहिले कर्जमाफी, दुष्काळी मदतीची सर्व माहिती घेऊ, अभ्यास करू त्यानंतर निर्णय घेऊ. याचा अर्थ राज्यातील जनतेने काय समजायचा? आता अभ्यास करणार म्हणजे आधी अभ्यास न करता हवेत गोळीबार करत, मागणी आपल्याकडून केली जायची. सत्तेत राहून, राज्याच्या कारभारात आपला गुंतागुंतीचा का होईना, पण थेट सहभाग असतानादेखील तुमच्याकडे, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती आजवर मिळाली नसल्यास तुम्ही किती कर्तव्यदक्ष आहात याचा प्रत्यय येतो. अहो साहेब, आता अलिकडल्या काळात तर सर्वसाधारण सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील मिनिटात माहिती मिळवून घेतात. तुमच्या मंत्र्यांना हे जमले नसेल, तर त्यांची योग्यता लक्षात घेता त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, असे वाटते. अन्यथा अशा या कर्तव्यदक्ष नेत्यांच्या खांद्यावर, भरवशावर आणि जिवावर राज्याचा गाडा हाकायला निघालात ना, त्याला कोणत्या चिखलात ते फसवतील हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही. आणि तुम्ही मात्र घात झाला, घात झाला, म्हणत बसाल...
 
शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेल!
 
मी माझ्या वडिलांना शब्द दिलाय्‌- ‘शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेल!’ आता शिवसैनिक पालखीचा भोई राहणार नाही. त्याला पालखीत बसवेल वगैरे वगैरे... आणि हा तुमच्या दैवताला दिलेला शब्द पाळण्यासाठी जुन्या मित्राशी वैर पत्करलं. अगदी तुमच्या भाषेत काय ते म्हणतात खंजीर खुपसला वगैरे... आणि शेवटी कुठे गेला तो दिलेला शब्द आणि वचन? शेवटी भोई हा भोईच राहिला आणि संधी साधून त्या भोयाच्या मुंडक्यावर लाथ देऊन खुर्चीवर ताबा मिळवलात. सार्‍या नैतिकतेच्या गोष्टी केवळ भाजपासोबतच- शब्द, वचन वगैरे... दुसर्‍याच्या जिवावर वस्त्रसुद्धा उतरवायचे, लाळघोटेपणा करायचा, चपला झिजवायच्या, यालाच म्हणतात होय तुमच्या शब्दातला स्वाभिमान? स्वाभिमानाची ही वेगळी परिभाषा तुमच्या निमित्ताने या राज्यातील जनतेला नव्याने माहिती झाली. नाही तर जनता उगाच तो बाणा आणि ताठ कणा वगैरेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवून बसली होती.
 
9270333886