ठाकरे सरकार आधुनिक लेण्या साकार करणार !

    दिनांक : 03-Dec-2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात आज बैठक घेतली. या बैठकीत मुंबई शहराच्या व राज्याच्या सांस्कृतिक व पर्यटन विषयक अनेक विषयांवर चर्चा झाली. शहरातील कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी अश्या लेण्यांचा विकास करून राज्यात योग्य ठिकाणी आताच्या युगातील लेणी विकसीत करता येतील. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
 

ब_1  H x W: 0 x 
जागतिक दर्जाचे मत्सालय उभारणार
देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
शहरातील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी शहरात सी वर्ल्ड, टुरीजम स्ट्रीट, फ्लेमींगो टुरीजम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी आदी सुरु करता येईल का याबाबतही यावेळी चर्चा झाली. शहराला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरु करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करुन ‘थीम बेस्ड’ संग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
लोणार सरोवराची स्वच्छता
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करुन त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.