सुचिंद्रम मंदिर

    दिनांक : 03-Dec-2019
अवंतिका तामस्कर
 
कोडाई कॅनालवरून कन्याकुमारीकडे जाताना कन्याकुमारीच्या अलीकडे साधारण 13 किमीवर असलेले भव्य सुचिंद्रम मंदिर मुद्दाम पाहावे असे मंदिर आहे. भाविकांची सतत येथे गर्दी असते. नवव्या शतकात हे मंदिर बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. त्या काळच्या अनेक शिलालेखांतून या मंदिराचा उल्लेख येतो. मात्र 17 व्या शतकांत या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. हे मंदिर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीला समर्पित आहे. मात्र ही त्रिमूर्ती येथे लिंग स्वरूपात आहे. विष्णूची अष्टधातूची मूर्ती नजर खिळवून ठेवणारी. मात्र पूजेनिमित्ताने घातलेल्या वस्त्रप्रावरणातून मूळ मूर्ती पाहायला मिळणे तसे अवघडच असते.

ज्क्ज_1  H x W: 
कन्याकुमारीचा विवाह शिवाशी होणार होता आणि याच मंदिरातून शिवाची वरात कन्याकुमारीला जायची होती अशी कथा येथे सांगितली जाते. मात्र नारद मुनींनी शंकराची दिशाभूल केली आणि त्यामुळे शंकर लग्नासाठी गेलेच नाहीत. अर्थात या मागे नारदांचा स्वतःचा फायदा काही नव्हता. माजलेल्या आणि उन्मत्त वाणासुराचा वध कुमारी कन्येच्या हातून होणार होता आणि कुमारीचा विवाह झाला तर वाणासुराचा वध होऊ शकणार नाही, या भीतीने नारदांनी हा विवाह होऊ दिला नाही. परिणामी शंकर लग्नाला गेले नाहीत आणि आपल्या वराची वाट पाहात कन्याकुमारी सागरतीरावर तशीच उभी राहिली.
 
या सुचिंद्रम मंदिरात हनुमानाची सुमारे 18 फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. शेपटी वर करून उभा राहिलेला हा हनुमान लंकेला आग लावल्यानंतर येथे उभा राहिला. शेपटीला रावणाने आग लावली होती, ती हनुमानाने समुद्रात विझविली आणि तो येथे आला. तरी जळलेल्या शेपटीची आग होतच होती. त्याचे प्रतीक म्हणून येथे येणारे भाविक हनुमानाच्या शेपटीला लोणी लावतात. अर्थात इतक्या उंचीवर हात पोहोचणे अवघड असल्याने शिडीच्या सहाय्याने वर चढलेले पुजारीच हे लोणी हनुमानाच्या शेपटीला लावतात. एकंदरीतच या मंदिरांच्या मागच्या ज्या कथा सांगितल्या जातात, त्या फार मजेशीर असतात, मात्र त्या रचणारे खरोखरच प्रतिभावान असले पाहिजेत, यात शंकाच नाही. अर्थात या कथा खर्‍या मानून त्याप्रमाणे वागणारे भाविक पाहिले, की- श्रद्धा ही काय चीज आहे, याची थोडी का होईना, कल्पना येते.
 
या मंदिरात आत जाताच काही दगडी खांब आहेत. त्यावर विशिष्ट पद्धतीने आघात केले, की- त्यातून सूर ऐकू येतात. अन्य खांबांप्रमाणेच हे खांब दिसतात, मात्र खरोखरच त्यातून येणारे आवाज ऐकले, की- थक्क व्हायला होते तसेच आपले स्थापत्यकार खरोखरच किती ज्ञानी आणि तज्ज्ञ होते, याची जाणीवही होते. मंदिराजवळ असलेल्या सरोवरात मध्यात एक मंडप असून तोही पाहण्यासारखा.
 
सुचिंद्रमपासून आठ किमीवर नागरकॉईल शहरात असलेले नागराज मंदिर चुकवू नये असे. चिनी पद्धतीची वास्तुकला असलेले हे मंदिर दिसायला बौद्ध विहारासारखे दिसते. मंदिरात नागराजाची मूर्ती आहे तसेच विष्णू आणि शंकराच्याही मूर्ती आहेत. येथील दगडांवर आहेत जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा. नागरकॉईल गाव तसे बर्‍यापैकी मोठे आहे. मात्र मुक्कामासाठी कन्याकुमारी गाठणेच योग्य. हा सर्व रस्ता नारळी बनातून जातो आणि कधी संपतो, याचा पत्ताही लागत नाही. स्वच्छ आणि भव्य मंदिरे हे दक्षिणेकडचे खास वैशिष्ट आहेच, पण आजही मंदिरातून नियमाप्रमाणे केल्या जाणार्‍या पूजाअर्चा, पालख्या, अनेक कार्यक्रम या मंदिरांची भेट आणखी सुंदर करतात, हे नक्की.