सर्व समाजाला सुख, शांती प्रदान करणारा 'धर्म विजय' हवा - डॉ. मोहन भागवत

    दिनांक : 26-Dec-2019
हैदराबाद: आपले ध्येय केवळ संघटना मोठी करणे हे नाही तर सर्व समाज संघटीत करणे हे आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हैदराबाद येथे विजय संकल्प शिबिराच्या कार्यक्रमात उपस्थित स्वयंसेवक आणि नागरिकांना संबोधित करताना केले. नासधूस करणारे व समजाला हानी पोहचविणारे असुर असतात व दुसऱ्यांना फसवून विजय मिळवणारे राजसी असतात. आपल्याला असुरी विजयही नको आणि कोणाचे सुख हिरावून मिळणारा राजसी विजयही नको; आपल्याला सर्व समाजाला सुख, शांती, समाधान देणारा व सर्वांना आपलेसे करणारा धर्म विजय हवा आहे. इतरांच्या सुखात आपले सुख मानून त्यांच्या दु:खाचे निवारण करणे व तसे आचरण करणे म्हणजे धर्म विजय आहे. आपणास तो विजय अपेक्षित आहे. असे स्पष्टीकरण डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी केले.
 
a_1  H x W: 0 x
 
डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, की सध्या देशभरात राजस आणि तामस शक्तीचे खेळ सुरु आहे. परंतु आपणास सात्विक विजय पाहिजे, ज्यामुळे शरीर, आत्मा आणि बुद्धीला सुख मिळेल. सर्वांच्या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग जर आपण बनत असू तर धर्म विजयाचा मार्ग मोकळा होतो. सरसंघचालकांनी मशालचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे मशाल उलटी केली तरी तिच्या ज्वाळा वरच्याच दिशेने जातात, त्याच प्रकारे सात्विक शक्ती सदैव उन्नतीकडे प्रवाही होतात, असे ते म्हणाले.
 
राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या निबंधातील उदाहरण देऊन डॉ. मोहन भागवत म्हणाले, की आज समाजाला प्रेरणा देणाऱ्या नायकांची गरज आहे. केवळ राजकारण करून देशाचे भले होणार नाही, तर समाज परिवर्तनाचीही आवश्यकता आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या 'स्वदेशी' या निबंधात म्हंटले आहे, की देशातील हिंदू-मुस्लीम आपापसात लढून नष्ट होती, अशी इंग्रजांना आशा आहे. परंतु, कायम होणाऱ्या या संघर्षातून समाज याचे उत्तर शोधेल व ते उत्तर 'हिंदू' असेल. ते म्हणाले, देशातील सर्व १३० कोटी नागरिक संघाच्या दृष्टीने हिंदूच आहेत. जो भारताला आपली मातृभूमी मानतो, येथील जल, जन, जंगल व भूमीवर प्रेम करतो तसेच उदार मानव संस्कृतीवर प्रेम करतो, सर्वांचे कल्याण करणाऱ्या संस्कृतीचे आचरण करतो, मग तो कोणत्याही भाषा, विचार किंवा उपासनेला मानणारा असो तो 'हिंदू' आहे.
 
a_1  H x W: 0 x 
 
डॉ. भागवत म्हणाले, भारत पुर्विपार हिंदुत्ववादी आहे. विविधतेत एकता नाही, एकतेचीच विविधता आहे. आस्था, विचार आणि विश्वास भिन्न असू शकतात, परंतु सगळ्यांचा निष्कर्ष एकच आहे. अंधार हटविण्यासाठी दुसऱ्याला पिडा द्यायची नसते, तर दिवा प्रज्वलित करायचा असतो. अंधार प्रकाशामुळेच दूर होऊ शकतो. तसेच, केवळ एक नायक असून चालणार नाही, तर गावागावात नायक तयार झाले पाहिजे, जे निस्वार्थ भावनेने कार्य करतील आणि ज्यांचे चारित्र्य निष्कलंक असेल. भारताचे भविष्य यामुळेच बदलू शकते. सरसंघचालक म्हणाले, की जग विश्वशांतीसाठी भारताकडे पाहत आहे आणि जगाला सुख शांतीसाठी मार्ग दाखविणारा 'संघटीत हिंदू समाज' आहे.