माझे पुतळे जाळा, गरीबाची रिक्षा कश्याला जाळता ? - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    दिनांक : 23-Dec-2019
नवी दिल्ली : "मोदींना देशाच्या जनतेने निवडले हे जर तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही मोदींना नाव ठेवा, मोदींचा तिरस्कार करा. मोदीचा जेवढा विरोध करायचा तेवढा नक्की करा, जेवढा राग काढायचा तेवढा काढा, एवढच नाहीतर मोदीचा पुतळा जाळायचा असेल तर तो देखील जाळा, परंतु देशाची संपत्ती जाळू नका.” असे म्हणत गरिबाच्या झोपड्या, वाहने जाळू नका. गरिबांना मारून तुम्हाला काय मिळणार? असा संतप्त सवाल पंतप्रधान मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या मुद्यावरून काँग्रेस, विरोधीपक्षांसह हिंसाचार करणाऱ्यांना उद्देशुन केला आहे.


न_1  H x W: 0 x 
 
दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा व हिंसाचार करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, याप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, हिंसाचार करणारे ज्या पोलिसांवर हे दगडफेक करत आहेत, त्यांना जखमी करत आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो की, ज्याप्रकारे पोलिसांच्या जवानांना जखमी केले जात आहे, त्याद्वारे तुम्हाला काय मिळणार? सरकार बदलत असते मात्र पोलीस तेच असतात, ते कोणाचेही शत्रू नाहीत. स्वातंत्र्यानंतर अद्यापपर्यंत जवळपास ३३ हजार पोलीस बांधव शांतता व सुरक्षेसाठी शहीद झाले आहेत आणि तुम्ही याच पोलीसांना अमानुषपणे मारत आहात. जेव्हा एखादे संकट येते, कोणती अडचण येते तेव्हा पोलीस धर्म किंवा जात अथवा वेळकाळ न पाहता तुमच्या मदतीसाठी उभा राहतो. दिल्लीतच मागील काही दिवसांपूर्वी ज्या मार्केटमध्ये आग लागली होती, अनेकांचा जीव गेला होता. तेव्हा पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षितरित्या आगीतून वाचवण्याचे कार्य केले होते.
 
 
देशातील आजच्या परिस्थितीत सर्वात जुन्या पक्षाचे नेते केवळ कायद्यावरून उपदेश देत आहेत. शांततेसाठी दोन शब्द सांगायला कोणी तयार नाही. हिंसाचार थांबवण्यास एकहीजण सांगत नाही, याचाच अर्थ या हिंसाचारास तुमची मुकसंमती आहे असा होतो व देश हे सर्व पाहत आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना उद्देशुन यावेळी म्हटले.