जनजाती समाजाच्या समस्यांवर तोडगा काढण्याची गरज - हर्ष चव्हाण

    दिनांक : 23-Dec-2019
नंदुरबार, 22 डिसेंबर
जनजाती समाजाच्या समस्या कुणी ऐकूण घेत नाही. त्यांच्या समस्या आजही निद्रित अवस्थेत असून जनजाती समाजाची प्रतिमा आणि अवस्था यात खूप फरक आहे. समस्या वेगळ्या असून त्यावर वेगळेच समाधान केले जाते. याऐवजी जनजाती समाजाविषयीची विचारसरणी बदलून समस्यांवर योग्य तोडगा काढण्यात यावा, असे प्रतिपादन जनजाती सुरक्षा मंचचे अखिल भारतीय प्रमुख हर्ष चव्हाण यांनी रविवारी येथे केले.
 

l_1  H x W: 0 x
 
 
देवगिरी कल्याण आश्रम महाराष्ट्र यांच्यावतीने नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात 22 रोजी आयोजित जनजाती चेतना परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते ट्रायफेड भारत सरकारचे चेअरपर्सन रमेशचंद्र मीणा, प्रांत सचिव पश्चिम महाराष्ट्र शरद शेळके, इंदूर येथील पोलीस उपअधीक्षक अमृता सोलंकी हे होते. तसेच खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, आ.राजेश पाडवी, माजी आ.डॉ.नरेंद्र पाडवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, कुवरसिंग वळवी, डॉ.कांतीलाल टाटिया, राजेंद्रकुमार गावीत, सखाराम पाडवी, देवगिरी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष चैत्राम पवार, ‘आप की जय’ परिवाराचे जितेंद्र पाडवी, मौल्या गावीत, डॉ.मनिष सूर्यवंशी, अ‍ॅड.सावंत वळवी, निवृत्त अधिकारी आशा पाडवी, रेखा नाईक, मीनाक्षी गवळी, सोनाली पाडवी आदी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
आदिवासी गीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
 
 
मिरवणुकीचा उत्साह
दरम्यान, सकाळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आदिवासी लोक नृत्य सादर करण्यात आले होते. मान्यवरांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. तेथून अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे चित्रकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या बॅनरचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. शबरी माता प्रभू रामचंद्रांना बोरे खाऊ घालत असल्याच्या प्रतिमेसमोर डॉ.प्रकाश ठाकरे यांनी श्रीफळ वाढवून अभिवादन केले. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करून भारत माता, याहा मोगी माता, भगवान बिरसा मुंडा, संत गुलाम महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. मान्यवरांना याहा मोगी देवीची प्रतिमा, श्रीफल, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
पहिल्या सत्रात इंदूर येथील जनजाती सुरक्षा जनजाती समाजाच्या...मंचचे अ.भा.प्रमुख हर्ष चव्हाण यांनी सांगितले की, आदिवासी संस्कृती खूप जुनी असून लोकांसमोर जी दाखवली जाते ती चित्रपटात बॉलिवूड-हॉलिवूडची आदिवासी संस्कृती असते. परंतु त्यांना आदिवासी संस्कृती संपवायची होती आणि ख्रिश्चन धर्म उभा करायचा होता. परंतु भारतात तशी परिस्थिती नाही. भारतामधील आदिवासी हा कष्टकरी, स्वावलंबी व मेहनती आहे. राज्यकर्ते जी पॉलिसी तयार करतात ती त्यांच्यादृष्टिने असते. परंतु आपल्या भागात आपणच आपल्या मेहनतीने आपली संस्कृती टिकवली पाहिजे.
 
 
टायगर व टायटल दोनो साथ मे रहते है.- डॉ.प्रकाश ठाकरे यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषातून केलेल्या प्रास्ताविकात सांगितले की, जनजाती चेतना परिषद ही काळाची गरज असून आपल्या समाजात देश विघातक लोकांकडून कृत्रिमरित्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक आव्हाने निर्माण करण्यात येत आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी समाजबांधवांनी एकत्र येणे, त्यावर विचार, चिंतन करणे गरजेचे आहे. अ‍ॅड. भगतसिंग पाडवी यांनीही पुराण काळातील विविध उपनिषदांचे दाखले देत सांगितले की, आदिवासी संस्कृती ही वेद-उपनिषदाच्या काळापासून आहे. वेद-उपनिषदात म्हटल्याप्रमाणे जंगलांचे संवर्धनदेखील आदिवासींनी केले आहे.
 

l_1  H x W: 0 x 
 
मान्यवरांचा सत्कार-
देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत संघटन मंत्री गणेश गावीत त्यांनी आदिवासी समाजात विशेष कार्य करणार्‍यांच्या सत्कारामागील भूमिका मांडली. त्यानुसार यावर्षी महाराज नितीन पाडवी, नाना पवार, डॉ.प्रकाश गांगुर्डे, ईश्वर गावीत, रायसिंग वसावे, सावन वसावे, कुंडलिक चौधरी, डॉ.मनीषा सूर्यवंशी, देवराम पवार आदींचा हर्ष चव्हाण, रमेशचंद्र मीणा, शरदचंद्र शेळके, अमृता सोळंकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
दुसर्‍या सत्रात रमेशचंद्र मीणा म्हणाले की, आदिवासी समाजाच्या शबरीमातेच्या हातून प्रभू रामचंद्रांनी उष्टी बोरे खाल्ली आहेत. ह्यावरून लक्षात येते की, त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती जंगलात होती. त्याचे रक्षण आदिवासी बांधव करीत होते. त्यामुळे आताच्या परिस्थितीत जे वन कापले गेले आहेत त्यांना वाढवण्याचे काम आपल्या हातात आहे. त्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीची लागवड करणे गरजेचे आहे. त्यातून असंख्य बेरोजगारांना काम मिळेल. त्यातूनच भारताची आर्थिक स्थितीदेखील सुधारणार आहे. ही जबाबदारी पूर्वीप्रमाणेच आजदेखील आपल्यावर येऊन ठेपली आहे. बिजासनी येथील शांताबाई किरडे यांनी ‘तिरंगा जनजाति जयजयकार’ असे आदिवासी भावगीत सादर केले.
 
 
प्रा. शरद शेळके म्हणाले की, जनजाती समाज दाबला गेला आहे. तो धर्माने बांधला जातो. धर्म हा संकुचित घटक नाही. त्यांनी इंग्रजांच्या इतिहासाच्या उल्लेख करीत इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणांची आठवण करुन दिली. वास्को-द-गामा सांगतो की, मी भारताचा शोध लावला. भारत त्यावेळेस होता. परंतु आपण इथपर्यंत जिथे थांबलो आहे त्यापुढील इतिहास इंग्रजांनी व आपल्या वाचकांनी देखील उलगडून पाहिला नाही. वास्को-द-गामा यांनी आदिवासी राजाकडून व्यापाराची सुविधा मागितली. व्यापार करताना आदिवासी राजाचा खून करून तो राज्यकर्ता झाला, असे इतिहासाचे दाखले देत त्यांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारी माणसे उभी केली होती. आज देखील आपल्याला आपला माणूस उभा करणे गरजेचे आहे.
 
 
कार्यक्रमाच्या समारोपात अमृता सोलंकी म्हणाला की, भारतामध्ये दोन नवीन विद्यापीठांनी जन्म घेतला आहे व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूक. यासोशल मीडियाने मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाच्या डोक्यात संभ्रम निर्माण केला आहे. त्यांनी हिंदू धर्मातील रूढी-परंपरांना विविधांगांनी हात घातला. कायदे हे बदलत असतात, कायद्याची भाषा बदलत असते. परंतु रूढी परंपरा बदलत नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर पोस्ट फिरत होती की, रावणाच्या पुतळ्याचे दहन करु नये, कारण रावण हा ब्राह्मणाचा मुलगा होता. मग तो आपला कसा ? असे उदाहरण देऊन त्यांनी पटवून दिले की, आमचे पूर्वज हनुमान होते. प्रभू रामचंद्रांसह सगळ्यांना विश्वास होता की, युद्ध आपण जिंकू. कारण सगळे संघटित होते. रावणाकडे त्याचे भाऊ देखील त्याच्यासोबत नव्हते. यावरून लक्षात येते की, आपण सत्य व धर्माच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. यशस्वीतेसाठी जनजाती चेतना परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश ठाकरे, कार्याध्यक्ष अ‍ॅड.भगतसिंग पाडवी, सचिव डॉ.विशाल वळवी, सहसचिव वीरेंद्र वळवी, गणेश गावीत यांच्यासह देवगिरी कल्याण आश्रम संलग्नित संघटनेच्या पदाधिकारी, स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील जनजाती बांधव आणि भगिनी तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.