याला म्हणतात लोकसंख्येचा बोनस!

    दिनांक : 02-Dec-2019
यमाजी मालकर |
 
सध्या देशाची अर्थव्यवस्था तुलनेने मंद झाली आहे. ती वर्षाला पाच टक्क्यांनी वाढत असली, तरी ती भारतासाठी पुरेसी नाही. वाढीचा हा दर जगात फार चांगला मानला जातो, पण लोकसंख्या आणि इतर काही कारणांनी भारतासाठी तो अधिक हवा आहे. अर्थात, जगात मंदीचे वातावरण असताना, जागतिकीकरणाने जगाशी जोडलेल्या भारतावर त्याचा परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे या मंदीचा सामना भारताला करणे भाग आहे. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे- जास्तीतजास्त भारतीयांची क्रयशक्ती वाढविणे. मागणी- पुरवठ्याच्या गणितात मागणी कमी पडते आहे. ती वाढली, की- ही मंदी पळून जाईल. सध्या देशात जे अत्यावश्यक आणि मूलभूत आर्थिक बदल होत आहेत, त्याचा परिणाम म्हणून नजीकच्या भविष्यात देशाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. मात्र याही परिस्थितीत भारतात नेमके काय घडले पाहिजे, हे एका खासगी कंपनीने दाखवून दिले आहे, जेआपण समजून घेतले पाहिजे.
 
 
l_1  H x W: 0 x
 
 
पुण्यात मुख्यालय असलेली बजाज फायनान्स नावाची शेअर बाजारात नोंद असलेली ही कंपनी सध्या चर्चेत आहे वस्तूंना मागणी नाही, अशी सर्वत्र स्थिती असताना या कंपनीला मागणीचा अजिबात प्रश्न नाही. अनेक कंपन्या मागणी आणि नफ्यासाठी धडपडत असताना या कंपनीने त्याचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. या कंपनीने गेल्या काही वर्षांत किती झेप घेतली, हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तिने ते ज्या मार्गाने हे साध्य केले आहे, ते अधिक महत्त्वाचे आहे. भारतीय नागरिकांना नेमके काय हवे आहे, हे शोधायचे असेल तर त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
 
आधी या कंपनीने काय साध्य केले आहे, ते पाहू. बजाज फायनान्स ही ग्राहकांना जीवनावश्यक आणि इतर वस्तूसाठी कर्ज देणारी कंपनी आहे. ती बँक नाही. ती बाजारातून पैसा उभा करते आणि तो कर्जरूपाने ग्राहकांना देते. या कंपनीने असे 10 हजार कोटी रुपये अलीकडे बाजारातून उभे केले आहेत. नॉन बँिंकग फायनान्स कंपन्या अडचणीत आल्यामुळे शेअर बाजाराला गेले सहा-आठ महिने मोठा धक्का बसला आहे. पण त्याच प्रकारच्या या कंपनीनेे याच काळात प्रगतीचे नवनवे मापदंड ओलांडले आहेत! उदा. या कंपनीचे बाजारमूल्य 2.46 लाख कोटी रुपयांवर गेले आहे, जेदेशातील सर्वात मोठी असलेल्या स्टेट बँकेशी स्पर्धा करू लागले आहे. जगात ज्या 500 कंपन्यांची वाढ गेल्या वर्षभरात सर्वाधिक झाली आहे, त्यात या कंपनीचा समावेश झाला आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीचा शेअर 1,318 टक्क्यांनी वाढला आहे. (सध्याच्या भाव 4118 रुपये ) दोन हजार पाचशे कोटी रुपये भांडवलाने सुरू झालेल्या या कंपनीकडे आज 1.5 लाख कोटी रुपये भांडवल असून तिने या वर्षाला 800 कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. देशातील 2000 शहरात तिची कार्यालये असून ती सध्या चार कोटी ग्राहकांना कर्ज देणारी कंपनी आहे. भविष्यात आणखी 450 शहरात कार्यालये सुरू करण्याची तयारी ती करते आहे. इतरत्र कर्ज घेणार्‍यांचे प्रमाण गेल्या वर्षभरात रोडावले आहे, पण याच काळात या कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत 38 टक्के अधिक कर्जवाटप केले आहे! याचा अर्थ असा, की- कोणत्याही आर्थिक निकषांत कंपनीची प्रगती थांबलेली नाही.
 
 
महत्त्वाचा प्रश्न असा, की- सध्याच्या मंद आर्थिक वातावरणात हे घडले कसे? या कंपनीचेे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राजीव जैन यांनी अलीकडेच या प्रवासाविषयीजी माहिती दिली, त्यावरून भारतीयांना नेमके काय हवे आहे, याची कल्पना येईल. या कंपनीने भारतातील मध्यम आणि निम्न मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित केले आहे. या वर्गाला टीव्ही, फ्रीज, एअर कंडिशन, स्वयंपाक घरातील वस्तू घेण्यासाठी कमी रकमेच्या कर्जाची गरज असते. ती गरज बँका भागवू शकत नाहीत. हे कर्ज सहा महिने ते तीन वर्षांचे असते. अशा ग्राहकांची क्रेडीट हिस्ट्ररी आणि क्षमता पाहून कंपनीने अशी छोटी कर्जे दिली. छोटी कर्जे बुडण्याची शक्यता कमी असते आणि सर्वसामान्य माणूस सहसा कर्ज बुडविणारा नसतो, असा आतापर्यन्तचा अनुभव आहे. त्यामुळे कंपनीला या कर्ज वाटपात चांगला फायदा झाला. डिजिटल व्यवहारांचाही कंपनीने फायदा घेतला, ज्यातून कर्ज वाटप प्रक्रिया सुलभ आणि किफायतशीर झाली. छोट्या कर्जांचे वाटप करून कंपनी इतका नफा कमावू शकते, यावर कोणाचा लगेच विश्वास बसत नाही. पण कर्ज घेणार्‍या ग्राहकांची संख्या तब्बल चार कोटी आहे आणि किमान 2000 शहरांत कंपनी पोहोचली आहे, हा आवाका लक्षात आला की त्याचे आश्चर्य वाटत नाही.
 
 
बजाज फायनान्ससारख्या कंपन्या आणि अलीकडे ‘पेटीएम,’ ‘गुगल-पे’सारखे येत असलेले अप हे आर्थिक व्यवहार अतिशय सुलभ करीत आहेत. पारंपारिक बँकिंगशी ते स्पर्धा करू लागले आहेत. त्यामुळेच स्टेट बँकेने अलीकडेच ‘योनो’ हे अॅप काढले असून त्यावर क्रेडीट हिस्ट्री चांगली असलेल्यांना घरबसल्या एक ते दीड लाख रुपयांचे कर्ज मिळू लागले आहे. एवढ्याच रकमेचे कर्ज घेण्यासाठी पूर्वी काय काय करावे लागत होते, हे आठवून पाहिले, की- आपल्याला या बदलाचे महत्त्व लक्षात येते. आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना छोट्या रकमेची कर्जे हवी आहेत आणि ती सुलभपणे मिळावीत, ही त्यांची गरज आहे. ती बजाज फायनान्सने भागविली, म्हणून ही कंपनी एवढी मोठी झाली. भारतीय नागरिकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. याचा अर्थ- त्यातील सर्वसामान्य नागरिकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. त्यासाठी त्याला वेळच्या वेळी पतपुरवठा होण्याची गरज आहे. तो केला गेला तर किती मोठा व्यवसाय होऊ शकतो, हे या कंपनीनेे दाखवून दिले. आश्चर्य म्हणजे- अशा कंपनीची आणि भारतीय ग्राहकशक्तीची क्षमता ओळखली, ती मात्र परकीय गुंतवणूकदारांनी, कारण या कंपनीचा 20 टक्के हिस्सा त्यांनी विकत घेतलेला आहे!
 
 
भारतीय ग्राहकशक्ती ज्यांनी ओळखली, त्यांनी मोठा व्यवसाय केला, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. ‘फ्लिफकार्ट’ आणि ‘अमेझान’सारख्या परकीय कंपन्यांनी दिवाळीत 31 हजार कोटींचा व्यवसाय भारतीय ग्राहकशक्तीच्या भरवशावर केला. आपण आपल्या प्रचंड लोकसंख्येचा बोनस घेण्यात कमी पडतो, असे अनेकदा लक्षात येते आहे. तो बोनस या कंपनीने घेतला. आपल्या देशाला दोष देत फिरणारे आणि मंदीच्या नुसत्या चर्चेत अडकेलेले तज्ज्ञ या क्षमता कधी आणि कशा ओळखणार आहोत?
(लेखक आर्थिक विषयाचे अभ्यासक आहेत).