विचारधारेला तिलांजली!

    दिनांक : 02-Dec-2019
गजानन निमदेव |
 
महाराष्ट्रात सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तारूढ झाले आहे. विचारधारेवरील राजकारणाच्या अंताचा प्रारंभ झाला आहे. राजकारणावर असलेले विचारधारेचे वर्चस्व कुठेतरी घसरले असल्याची तीव्र भावना राज्यातल्या नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेने विचारधारेवर मात केल्याचे दुर्दैवी चित्र उभा महाराष्ट्र पाहात आहे. कालपर्यंत शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ला धर्माच्या पलीकडे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. धर्मनिरपेक्ष असे गोंडस नाव या आघाडीने स्वत:ला दिले. पण, स्वातंत्र्य मिळाल्यापासून धर्माच्याच नावावर मते मागून स्वत:ची राजकीय पोळी काँग्रेस-राकाँने कशी शेकली, हे देशाने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. कट्‌टर हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याआड कायम जातीयवादी राजकारण करणारे काँग्रेस-राकाँ हे दोन पक्ष म्हणजे राजकारणातले दोन ध्रुवच! पण, सत्तालालसेपायी हे दोन ध्रुव एकत्र आले आहेत. शिवसेना आणि काँग्रेस आघाडी यांच्यात गंभीर वैचारिक मतभेद असतानाही ते एकत्र आलेत, याचे महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला आश्चर्य वाटते आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळताना यांना जराही लाज वाटली नाही, याचे दु:खही महाराष्ट्रातील जनतेला झाले आहे.
 

j_1  H x W: 0 x 
 
जे घडले ते अतिशय दुर्दैवी घडले आहे. संपूर्ण महाराष्ट्राची ही भावना नसली, तरी ज्यांनी महायुतीला कौल दिला होता, त्या बहुतांशी मतदारांची मनं या प्रयोगाने दुखावली आहेत, हे निश्चित! तसे पाहिले तर ही अभद्र युती झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला फसवणारा हा प्रयोग किती दिवस टिकेल, हे आजच सांगता येणार नसले, तरी या प्रयोगाचा फटका तीनही राजकीय पक्षांना बसणार, यात शंका नाही! यापूर्वी काँग्रेसने कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जनता दल युनायटेडच्या एच. डी. कुमारस्वामी यांच्यासोबत केला होता. तो अल्पावधीत फसला. त्याचे घातक परिणाम काँग्रेस आजही भोगत आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने समाजवादी पार्टीशी हातमिळवणी करून आत्मघात करून घेतला, याचे विस्मरण देशवासीयांना अद्याप झालेले नाही. जे काँग्रेसने केले, तोच प्रयोग 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि मायावतींची बहुजन समाज पार्टी यांनी उत्तरप्रदेशात युती केली होती. त्यांचे काय हाल झाले, हे आपण पाहिलेच आहे. दोन्ही पक्षांचे जे नुकसान झाले, ते कधीही भरून निघणारे नाही.
 
 
कुणी आत्मघातच करून घ्यायचे ठरवले असेल तर उपाय नाही. आपल्याकडचे राजकारणी जनतेला बहुधा अल्प स्मरणशक्ती असलेले मानत असावेत. पण, ती त्यांची चूक आहे. देशात, राज्यात काय घडते आहे, यावर जनतेची बारीक नजर असते. कुठलीही गोष्ट जनता लवकर विसरत नाही. विशेषत: राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी केलेल्या गंभीर चुका जनता कधीच विसरत नाही. म्हणूनच अनेकदा निवडणुकांचे निकाल हे वेगवेगळे लागत असतात. महाराष्ट्रात जनतेने सर्वाधिक 105 जागा भाजपाला दिल्या असताना, भाजपापेक्षा अर्ध्या जागा जिंकणार्‍या शिवसेनेने, ज्यांना जनतेने नाकारले त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि जनतेच्या इच्छेच्या विपरीत सरकार स्थापन केले, याचा विसर जनतेला पडेल, या भ्रमात कुणीही राहू नये.


विचारधारा सोडणार्‍यांची साथ भविष्यात जनताही सोडते, हेही लक्षात घेतले पाहिजे. कारण, विचारधारा हा राजकारणाचा आत्मा समजला जातो. ज्या राजकीय पक्षांचा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे वा होतो आहे, त्यांनी आपली चूक कुठे होते आहे, हे नेमकेपणाने समजून घेणे गरजेचे आहे. शेवटी विविध राजकीय पक्षांमध्ये नेमका फरक काय आहे, हे ठरविण्यासाठी मतदारांजवळ काहीतर आधार असावा लागेल ना! जनतेला फरक कळत असतो आणि त्याआधारेच जनता निर्णय करीत असते. कुणीही जनतेला गृहीत धरू नये, याबाबतचे संकेत जनतेने वेळोवेळी दिले आहेत. केवळ भाजपावर असलेल्या रागातून आपण विचारधारेला तिलांजली देत विरुद्ध विचारधारेशी हातमिळवणी करीत आहोत, याचे दूरगामी परिणाम आपल्याला भोगावे लागतील, हे शिवसेेनेच्या धुरीणांनी लक्षातच घेतलेले दिसत नाही. वैचारिक पृष्ठभूमी सोडून वागण्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल, याचा विचारही शिवसेनेने केलेला दिसत नाही. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसयांच्याशी सैद्धांतिक लढाई लढलेल्या प्रामाणिक शिवसैनिकाला ही बाब तर अजीबात पसंत पडलेली नाही. नेतृत्वाने हा निर्णय शिवसैनिकांवर लादलेला आहे, अशी खंत अनेक शिवसैनिकांनी बोलून व्यक्त केली आहे.
 
 
त्याकडे डोळेझाक करणे सेनेला परवडेल? भाजपा आणि शिवसेना यांची वैचारिक पृष्ठभूमी जुळणारी होती. पण, काँग्रेस-राकाँ यांची वैचारिक पृष्ठभूमी ही शिवसेनेपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे नाराज शिवसैनिक भविष्यात भाजपाकडे आकृष्ट झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. जे नुकसान भविष्यात शिवसेनेला होणार आहे, तसेच नुकसान काँग्रेसचेही होणार आहे, हे त्या पक्षाच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे. शिवसेनेचे हिंदुत्व हे भाजपापेक्षाही कट्‌टर असल्याचे देशाने अनुभवले आहे. त्यामुळे भाजपाशी सैद्धांतिक लढाई लढणार्‍या काँग्रेसने आता कट्‌टर हिंदुत्ववादी शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसचेही अधिक नुकसान होणार, हे निश्चित! शिवसेना हा तसाही प्रादेशिक पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्व संपूर्ण महाराष्ट्रातही नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, मराठवाड्याचा काही भाग, विदर्भाचा काही भाग असे सेनेचे अस्तित्व आहे. पण, काँग्रेस तर देशातील सर्वात जुना, पण आज अतिशय कमजोर झालेला राष्ट्रीय पक्ष आहे. म्हणूनच काँग्रेसने आपल्या व्यापक हिताचा विचार करून शिवसेेनेशी हातमिळवणी करायला नको होती. पण, ही साधी बाबही काँग्रेस नेत्यांच्या ध्यानी येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही प्रादेशिकच आहे. त्याच्या नावात राष्ट्रवादी हा शब्द असला, तरी हा पक्ष केवळ महाराष्ट्रवादी आहे, हेही काँग्रेसने लक्षात घ्यायला हवे होते. ज्या भाजपाला काँग्रेस पक्ष हिंदुत्वाच्या मुद्यावर धारेवर धरत होता, तो काँग्रेस पक्ष भविष्यात भाजपाशी कोणत्या आधारावर लढणार आहे? कारण, भाजपापेक्षाही कट्‌टर हिंदुत्ववादी शिवसेनेचे शिवबंधन काँग्रेसच्या मनगटावर बांधले गेले आहे. जर विचारधारा एक आहे, ध्येयधोरणे एक आहेत, किमान समान कार्यक्रमही आहे, तर मग निवडणुकीत जनता फरक कशाच्या आधारावर करणार आहे? जनतेला नेमका कोणता बदल अपेक्षित राहील आणि तो पदरात पाडून घेता येईल? या सगळ्या मुद्यांचा आता जनतेलाही बारकाईने विचार करावा लागणार आहे.
 
 
भारतीय जनता पार्टीचीही स्वत:ची एक विचारधारा आहे. या पक्षाने ती कायम जपली आहे. एक काळ असा होता की, भाजपाकडे निवडणूक लढण्यासाठी उमेदवारही नसायचे. कुणाला उभे करायचे, हा प्रश्न असायचा. पण, भाजपाने आपली विचारधारा कधी सोडली नाही. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाच्या माध्यमातून भाजपाची जी पायाभरणी केली, एक मजबूत पाया रचला, तो आज अधिक मजबूत झाला आहे आणि एकेकाळी अस्पृश्य मानल्या जाणार्‍या भाजपाचा जनाधार वाढला आहे, देशभर विस्तार झाला आहे. अशा भारतीय जनता पार्टीने वैचारिक जवळीक असलेल्या शिवसेनेशी युती केली, तीस वर्षे आधी केली. ती दीर्घकाळ टिकली. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही युती होती. जनतेनेही गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून भाजपाला 105 आणि शिवसेनेला 56 अशा एकूण 161 जागा महायुतीच्या झोळीत टाकल्या. पण, शिवसेना युतीधर्माला जागली नाही. आता तर असा संशय येतो आहे की, संजय राऊत यांच्या माध्यमातून शिवसेनेने निवडणुकीआधीच निवडणुकीनंतरच्या व्यूहरचनेची तयारी शरद पवार यांच्यासोबत केली होती. कारण, विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती येण्याअगोदरच संजय राऊत हे शिवसेनेपुढे सगळे पर्याय खुले असल्याची भाषा करीत होते. संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितले. शिवसेना भाजपाशी चर्चा करायलाही तयार नव्हती. शेवटी कंटाळून भाजपाने सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे राज्यपालांना कळवले.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडीही सरकार स्थापन करण्यास विलंब करीत होती. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. काही दिवस लोटले असताना अचानक एके दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचा या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. पण, ते सत्य होते. भाजपाने रात्रीतून हालचाली करीत सत्ता कशासाठी स्थापन केली, याचे उत्तर महाराष्ट्र अजूनही शोधतो आहे. भाजपानेही विचारधारेशी तडजोड केल्याचा आरोप भाजपावर होतो आहे. पण, ही तडजोड का करण्यात आली होती, याचे उत्तर आजतरी जनतेला मिळालेले नाही. भविष्यात ते मिळेल अन्‌ तडजोडीमुळे भाजपाचे झालेले नुकसानही भरून निघेल, अशी आशा भाजपाच्या समर्थकांना अजूनही आहे. भाजपा निरर्थक काही करील, यावर विश्वास ठेवायला समर्थक राजी नाहीत. हीच भाजपाची खरी ताकद आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याचा आणि युतीतला मोठा भाऊ म्हणून मुख्यमंत्रिपद मिळवण्याचा भाजपाचा नैसर्गिक दावा शिवसेनेने नाकारला, ही भाजपासमर्थकांची भावनाही चुकीची नाही. त्यामुळे भाजपाने अजित पवारांना हाताशी धरून 78 तासांचे सरकार स्थापन केल्यावरही समर्थक नाराज नाहीत, ही भाजपाची जमेची बाजू मानली पाहिजे. काही लोकांना असे वाटते की, फडणवीसांनी असे करायला नको होते. पण, राजकीय अपरिहार्यता काय होती, हे अजून समोर आले नसल्याने आणि ते येणारच नाही असे नसल्याने, आताच फडणवीसांवर टीका करणेही योग्य ठरणार नाही.
 
 
महाराष्ट्रातील जनतेने सत्तास्थापनेचा कौल हा भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला दिला होता. असे असताना शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता हस्तगत करून लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली आहेत, हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. पदलालसा, पुत्रमोह आणि वैयक्तिक स्वार्थ हे अवगुण अतिशय बेशरमपणाने महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले आहेत, हे पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्राचे दुर्दैवच! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात देश जेवढा पुढे गेला आहे, तेवढाच राजकीय क्षेत्रात लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यात महाराष्ट्र मागे गेला आहे. कुणामुळे गेला, याची उजळणी करण्याची आवश्यकता नाही. ते ओळखण्याएवढी जनता हुशार आहे.
 
 
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी काही चुकीचे केले नव्हते, तर त्यांना आमदार फुटण्याची भीती का होती? त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलांमध्ये डांबून का ठेवले? का म्हणून त्यांना या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये हलवले, का म्हणून काँग्रेसने आमदारांना जयपूरला पाठविले? आमदारांना ओलीस ठेवणार्‍या पक्षांनी सगळी राजकीय नीतिमूल्ये पायदळी तुडविली आणि आता उजळ माथ्याने राज्याचे सत्ताशकट हाकायला निघाले आहेत. हॉटेलात पक्षबंधनात इच्छेविरुद्ध राहणार्‍या आमदारांनीही त्यास विरोध केला नाही. आत्मसन्मान विकल्यासारखे ते तिथे राहिले. पक्षशिस्तीच्या नावाखाली या आमदारांना अक्षरश: कोंडून ठेवण्यात आले. आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांवर पक्षनेतृत्वाचा विश्वास नव्हता? का नव्हता? कारण, कुठेतरी चुकीचा निर्णय करायला निघालेले नेतृत्व दहशतीत होते. आमदार फुटले अन्‌ भाजपाला जाऊन मिळाले तर आपली योजना फसेल, याची भीती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. सत्तेची लालसा, पुत्रमोह आणि परिवारवाद यामुळे आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष स्वत:ला संपवायला निघाले आहेत. आज त्यांची सत्ता आल्याने ताकदही जरूर दिसते आहे. पण, कालांतराने ती दिसेलच याची शाश्वती राहिलेली नाही.
 
 
2 ऑक्टोबर 2019 रोजी संपूर्ण देशात महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यात आली. देश दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त व्हावा आणि स्वराज्य यावे, त्या माध्यमातून सुराज्य स्थापित व्हावे, हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. देश केवळ इंग्रजांच्या जोखडातून मुक्त व्हावा, एवढे मर्यादित स्वप्न गांधीजींनी बघितले नव्हते. मनुष्यजीवनाच्या प्रत्येक पैलूवर अतिशय गहन मनन-चिंतन गांधीजींनी केले होते. सत्याच्या शोधात त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जनतेपुढे ठेवल्या होत्या. काळाच्या ओघात आम्ही त्या विसरत चाललो आहोत की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी, हे त्या भीतिमागचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने यापुढे निवडणुकीत मतदान करताना सर्वंकष विचार करून आपल्या विवेकाचा वापर करावा, एवढेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते...