शिवस्मारकाच्या निविदेत कसलाही भ्रष्टाचार नाही - चंद्रकांत पाटील

    दिनांक : 17-Dec-2019
नागपूर: अरबी समुद्रात होणाऱ्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. शिवस्मारकाच्या निविदेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा अनियमितता नाही. याबाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे चंद्रकांत पाटील यांंनी ठणकावून सांगितले. नागपूर येथे होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गेले असता पाटील यांनी याबाबत भाष्य केले.
 
c_1  H x W: 0 x
 
गेल्या काही दिवसांपासून शिवस्मारकाच्या कामात भाजपा सरकारने भ्रष्टाचार केल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नुकताच याचा पुनरुच्चार केला व चौकशी केली जाईल, असे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी मात्र हे सगळे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. शिवस्मारकाच्या कामाचे ३८०० कोटींचे टेंडर २५०० कोटींवर आले आहे. अद्याप एका पैशाचंही पेमेंट केलं गेलेलं नाही. त्यामुळे यात भ्रष्टाचार किंवा अनियमितता काहीही नाही. या प्रकरणी आम्ही सर्व चौकशांना तयार आहोत. लवकर चौकशी करा. लांबवू नका, असे आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिले. प्रस्तावित शिवस्मारकामुळे सरकारमधील काहींच्या पोटात दुखत आहे, असा आरोपही त्यांनी केला.