नाथाभाऊंच्या मनात चाललंय काय? कोणाच्या वाटेवर...

    दिनांक : 10-Dec-2019
जळगाव: एकनाथ खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी काल दिल्लीत होते. मात्र या भेटी होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे खडसे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा होऊ लागली होती. पण त्यावर खडसेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

न_1  H x W: 0 x 
 
भाजपचा एक मोठा गट पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावं आघाडीवर आहेत. खडसे या नाराज नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे हा नाराज गट काही वेगळा विचार करू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली आहे. मात्र हि भेट १२ तारखेच्या कार्यक्रमानिमित्त होती असे त्यांनी सांगितले. तसेच भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीविषयी मला काही निरोप नाही,कदाचित त्यांनी मला कामिटीतून काढलं असावं अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुक्ताईनगरमधून नाकारलेली उमेदवारी खडसेंच्या जिव्हारी लागली. त्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र रोहिणी यांचा पराभव झाला. त्यानंतर खडसेंची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यांनी ती वारंवार बोलू दाखवली. मात्र आपण कुठल्याही पक्षात जाण्याबाबत अजून निर्णय घेतला नसल्याचं खडसेंनी सांगितलं आहे. त्यामुळे नाथा भाऊंच्या मनात काय चाललंय याबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता लागून आहे.