जबाबदार कोण? उपाय काय...?

    दिनांक : 10-Dec-2019
मध्य दिल्लीतील फिल्मिस्तान भागातील अनाज मंडीत एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मनाला चटका लावणारी होती. आपल्या देशात अशा घटना वारंवार घडतात, घटना घडल्यानंतर दु:ख व्यक्त केले जाते, मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना नुकसानभरपाईची घोषणा केली जाते, लोक मोर्चे काढतात, निषेध करतात, मग आगीसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले जाते आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते. झालेली घटना लोक विसरून जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे असेच सुरू आहे आणि निष्पाप लोक मरतच आहेत. कारण नसताना, दोष नसताना मरताहेत. शासन-प्रशासन तर मुर्दाड असतेच, समाजमनही मुर्दाड झाले आहे, हे सगळ्यात दुर्दैवी आहे. हैदराबादच्या घटनेने देशभर आक्रोश होता. पण, तेलंगणाच्या पोलिसांनी चकमकीत, बलात्काराच्या चार आरोपींना गोळ्या घालून ठार मारले आणि आक्रोश जल्लोषात बदलला. पण, हा जल्लोष काही कामाचा नाही.
 

k_1  H x W: 0 x 
 
कारण, आजही आपल्या देशात बलात्काराची दीड लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. लाखो प्रकरणे तर बदनामीच्या भीतिपोटी नोंदलीच जात नाहीत. त्यामुळे एका प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठार मारले म्हणून जल्लोष करण्याचे कारण नव्हते. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणात सात वर्षे उलटूनही न्याय झालेला नाही. उन्नावच्या बलात्कारपीडितेने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळाला न्याय तिला? नाही. कारण? भ्रष्ट शासन-प्रशासन. शासनात कोणत्या पक्षाचे नेते आहेत याला काहीच महत्त्व नाही. प्रशासनात कोण अधिकारी आहेत यालाही महत्त्व नाही. कारण, हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत. गुन्हेगारांना पाठीशी घालतात ते आपण निवडून दिलेले नेते अन्‌ पैसा खाऊन त्यांना सुरक्षित सोडतात ते पोलिस आणि प्रशासनातले अधिकारी-कर्मचारीच ना? आपल्यापैकीही अनेक जण आपला गुन्हा लपवण्यासाठी ओळखीच्या नगरसेवकाचा, आमदाराचा, अधिकार्‍याचा आश्रय घेतोच ना? चुका करायच्या अन्‌ त्यासाठी कारवाई होऊ नये म्हणून पोलिस व प्रशासनातील लोकांना चिरीमिरी द्यायची, ही घाणेरडी सवयही आपण सामान्य म्हणवणार्‍या नागरिकांनीच त्यांना लावली ना? मग घडणार्‍या घटनांचा दोष आपण आपल्याकडेही का नाही घ्यायचा? देशात ज्या काही घटना घडतात, त्यासाठी जसे राजकीय नेते, पोलिस, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जबाबदार आहेत, तसेच आपण सामान्य म्हणविणारे लोकही जबाबदार आहोत, याचा विसर पडल्याने आणि सगळे काही बिनबोभाट चालल्याने दुर्घटना घडायच्या थांबत नाहीयेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
आपल्या देशात कायदे आहेत, नियम आहेत. त्यांची अंमलबजावणी करणार्‍या प्रभावी यंत्रणा आहेत. पण, या यंत्रणांना सडवण्याचे काम आम्ही सामान्य माणसांनीच केले आहे. पण, हे सत्य आम्ही कधीच मान्य करणार नाही. कारण, आम्ही करंटेपणा करायचा ठरवलाच आहे. सगळा दोष शासन-प्रशासनावर ढकलून चालणार नाही. जे काही कायदे आहेत, नियम आहेत, त्यांचे कसोशीने पालन करण्याची जबाबदारी आमची नाही? जर आपण नियम पाळले अन्‌ त्यानुसार वागलो तर कुणाची िंहमत आहे हा तुम्हाला त्रास देण्याची? असे म्हणतात की, या समाजात दुर्जनांच्या दुष्ट शक्तीपेक्षा सज्जनांची निष्क्रियताच अधिक घातक आहे. खरेच आहे. मला काय त्याचे, ही प्रवृत्ती बळावत चालल्यानेच सगळे गैरप्रकार घडत आहेत आणि दुर्घटनाही होत आहेत. जोपर्यंत आपल्याला एखाद्या दुर्घटनेची झळ पोहोचत नाही, तोपर्यंत आपले डोके ठिकाणावर येत नाही, हेच खरे! आपल्याला काय त्याचे, ज्याचे तो पाहील, ही जी वृत्ती बळावत चालली आहे ना, तीच नवनव्या घटना, दुर्घटनांना जन्म देते आहे, याचाही आम्हाला विसर पडत चालला आहे. अपघात घडल्यानंतर अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावा यासाठी आम्ही त्यांना मदत करण्याऐवजी व्हिडीओ तयार करण्यात वेळ वाया घालवतो आणि समोरचा मदतीअभावी दम तोडतो. एवढे करंटे का झालो हो आम्ही? कधी विचार करणार आहोत की नाही? की स्वत:ला सुज्ञ समजण्यातच धन्यता मानत राहणार? सामान्य म्हणविणार्‍या आम्हा नागरिकांमधील सहनशक्ती संपलेली आहे. कुठलेही काम करवून घेण्यासाठी प्रतीक्षा करण्याची आमची मानसिकता मेली आहे. आम्हाला झटपट काम करवून हवे आहे. त्यासाठी आम्ही लाच द्यायलाही तयार असतो. पण, या लाचखोरीचे परिणाम किती गंभीर होतात आणि ते आपल्यालाच कसे भोगावे लागतात, त्यासाठी प्रसंगी प्राणही गमवावे लागू शकतात, याची जाणही आम्हाला राहिलेली नाही. यासाठीच का मुक्त झालो आम्ही इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून? एकही पैसा न देता आपले काम करवून घेणे, हा या देशातील नागरिकांचा अधिकार आहे. तो घटनादत्त आहे. कामासाठी चकरा माराव्या लागल्या तरी चालतील, पण एकही रुपया न देता काम करवून घेईल, अशी समाजाची मानसिकता तयार करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. जे काम नियमानुसार आहे, त्यासाठी लाच देण्याची आवश्यकताच नसताना लाच दिली जाते. अनेकदा तर आम्ही न मागताही लाच देतो. कारण, काम करवून घेण्याची आम्हाला अतिघाई असते. आपल्या या घाईतून आणि कर्मचार्‍यांच्या भ्रष्ट सवयीतूनच सगळे गैरप्रकार जन्माला आले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
देशात दरवर्षी शेकडो ठिकाणी आगी लागतात, काही ठिकाणी त्या लावल्या जातात. पण, त्यातून आम्ही आणि प्रशासन असे कुणीच काही धडा घेत नाही. शेकडो निष्पाप जीव विनाकारण प्राण गमावतात. लोकसंख्या सव्वाशे कोटी झाली याचा अर्थ अशा आगींमध्ये लोकांनी मरावे, असा होत नाही. हरयाणात मंडी डबवाली येथे 1995 साली शॉर्ट सर्किटने आग लागली होती. त्या आगीत होरपळून आणि आग लागल्याच्या वार्तेने झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 540 लोक मृत्युमुखी पडले होते. फेब्रुवारी 1997 मध्ये ओरिसात बारिपाडा येथे एका धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी लागलेल्या आगीत 148 लोकांना प्राण गमवावा लागला होता. 2006 साली उत्तरप्रदेशातल्या मेरठ येथे एका प्रदर्शनीच्या आयोजनस्थळी लागलेल्या आगीत 100 लोक मृत्युमुखी पडले होते. आगीच्या अशा अनेक घटना घडतात, शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. घटना काळाच्या पडद्याआड जाते, लोकही विसरतात. पुन्हा नवीन घटना घडली की आक्रोश सुरू होतो. पण, याला काही अर्थ नसतो. अशा दुर्घटना घडूच नयेत यासाठी सरकारने कठोर उपाय योजले पाहिजेत, नागरिकांनी सर्व नियमांचे कसोशीने पालन केले पाहिजे, हे जोपर्यंत घडणार नाही, तोपर्यंत अशा दुर्घटना रोखता येणे शक्य होणार नाही. स्वयंशिस्त फार महत्त्वाची आहे. पण, दुर्दैवाने तिचा सगळीकडेच अभाव जाणवतो आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने वाहनचालकांसाठी कठोर नियम करताच, त्यावर टीका सुरू झाली. दंडाची रक्कम फार जास्त आहे, सामान्य माणूस दंड कसा भरणार, असा प्रश्न उपस्थित केला गेला. पण, यासाठी एक सोपी बाब आहे. नियम पाळा आणि दंड टाळा. पण, नाही. आम्हाला नियमही पाळायचे नाहीत आणि दंडही टाळायचा आहे. हीच मनोवृत्ती कायम राहिली, तर ईश्वरही आपल्याला वाचवू शकणार नाही, हे लक्षात ठेवावे!