शिवसेनेची कोलांटउडी; नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास आता करणार विरोध

    दिनांक : 10-Dec-2019
मुंबई: नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत आहे. काल या विधेयकाला शिवसेनेने लोकसभेत समर्थन दिले. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय, असा थेट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावेळी आम्ही राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मी राज्यसभा सदस्यांकडून याची माहिती मागवली आहे. त्यावर विचार करुन अधिकची भूमिका स्पष्ट करेन असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
 
ल_1  H x W: 0 x
 
हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या शिवसेनेने विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांची विचारधारा आणि सत्ता यांचा ताळमेळ बसवताना शिवसेनेची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकास समर्थन दिले. पण नंतर त्यांची हि भूमिका कॉंग्रेसला पचनी पडली नाही. त्यामुळे कॉंग्रेस ने नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच कि काय मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका दिवसात भाषा बदललेली दिसत आहे. या नव्या विधेयकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय शिवसेना राज्यसभेत मतदान होणार नाही. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये. शिवसेनेने आपली सतत आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेत.
आमच्यासारखे सर्वच पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडले जाण्यापूर्वी त्यामध्ये सूचवलेल्या सूचनांची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नसल्याचेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तर शिवसेनेने आपल्या विचारधारेला तिलांजली दिली आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार भातखळकर यांनी दिली आहे.