सूर्यापेक्षा 70 पट मोठ्या कृष्णविवराचा लागला शोध!

    दिनांक : 30-Nov-2019
बीजिंग: आपल्या आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा 70 पट महाप्रचंड अशा राक्षसी कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला आहे. तारे आणि ग्रहांची उत्क्रांती कशी झाली, याबद्दल आजवर जे सांगितले जाते, त्या सिद्धांतालाच यामुळे आव्हान मिळाले आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
 
 
आकाशगंगेत अंदाजे 100 दशलक्ष तार्‍यांसारखे दिसणारे ब्लॅक होल्स आहेत. ही कृष्णविवरे इतकी घट्ट आहेत की, त्यातून सूर्यप्रकाशही पलीकडे जाऊ शकत नाही. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा अंदाज होता की, आपल्या आकाशगंगेतील स्वतंत्र असे एकेक कृष्णविवर हे सूर्याच्या 20 पटीपेक्षा जास्त नाही. या नव्या शोधामुळे मात्र आतापर्यंतचा समज भुईसपाट झाला.
 
 
आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना फार मोठ्या कृष्णविवराचा शोध लागला. या अभ्यास गटाचे नेतृत्व नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी ऑफ चायनाने केले होते. हे संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झाले. त्यात कृष्णविवराचे नामकरण एलबी-1 असे केले गेले असून, ते पृथ्वीपासून 15 हजार प्रकाशवर्षे दूर आहे.
ग्रह-तार्‍यांच्या उत्क्रांतीचे जे बहुतेक सिद्धांत आहेत, त्यांचा विचार केला तर कृष्णविवरांचा हा समूह आमच्या आकाशगंगेत अस्तित्वात असायलाच नको, असे एनएओसीचे प्रोफेसर लिऊ जिफेंग यांनी म्हटले.