शिवसैनिकाला पालखीत बसवणार होतात ना?

    दिनांक : 30-Nov-2019

महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना कौल दिला होता, त्या भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार सत्तेत येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अभद्र आघाडीचे सरकार सत्तारूढ होणार, हे स्पष्ट झाले आहे. आपल्या हयातीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला गाडण्याची भाषा केली होती. आयुष्याच्या अखेरपर्यंत बाळासाहेबांनी या दोन्ही विरोधकांना गाडण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षात ते 1995 साली यशस्वीही झाले होते. त्यानंतर हयात असेपर्यंत त्यांनी कॉंग्रेस-आघाडीला पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडले. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणार्‍या बाळासाहेबांच्या शिवसेनेने 1990 च्या दशकात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी मिळवली होती. प्रखर हिंदुत्व अंगीकारत हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणार्‍या बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वविरोधकांना जवळ केले नव्हते. 1992 साली जेव्हा अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे तमाम हिंदुत्ववाद्यांची मान गर्वाने उंचावली होती.
 

 
 
 
‘‘बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे,’’ असे बाळासाहेब ठाकरे यांनी ठासून सांगितले होते. आज बाळासाहेबांच्या वारसांनी ज्यांच्यासोबत संसार थाटण्याचा निर्णय केला आहे, त्यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्यास कायम विरोध केल्याचे विस्मरण वारसांना झाले आहे, हे अतिशय दुर्दैवी होय. भांडण खुर्चीसाठी नाही, पदांसाठी नाही, असे बाळासाहेब नेहमी सांगायचे. महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी आयुष्य खर्ची घालणार्‍या बाळासाहेबांच्या वारसांनी मात्र केवळ खुर्चीसाठी हिंदुत्वविरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. मध्यंतरी जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता, तेव्हा संघाचे हिंदुत्व आणि आमचे हिंदुत्व वेगळे आहे, असे जे विधान शिवसेनेने केले होते, त्यातला फरकही आता जनतेला कळून चुकला होता. राममंदिराचा मुद्दा तापलेला असतानाच, मधु मंगेश कर्णिक यांची एक कादंबरी आली होती. त्यात एक जण नायकाला विचारतो की, संघाचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व यात काय फरक आहे? तो नायक जे उत्तर देतो, ते जनतेच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं आहे. संघाचं हिंदुत्व हे कातडीसारखं शरीराला घट्‌ट चिकटलेलं आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे अंगावरील शालीसारखं कधीही उतरून टाकण्यासारखं आहे. काय दूरदृष्टी होती हो कर्णिक यांची! सध्या महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती आहे, तिला ही बाब तंतोतंत लागू पडते. एका मुख्यमंत्रिपदासाठी वारस एवढी टोकाची तडजोड करतील, तेही विचारसरणीत प्रचंड तफावत असलेल्या राजकीय विरोधकांशी, याचा विचारही सामान्य माणसाने कधी केला नव्हता.
 
 
विधानसभेची निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने अन्य मित्रपक्षांशी युती करून लढली होती. त्यामुळे ‘महायुती’ असे नाव पडले होते आणि मतदारांनाही ते आवडले होते. म्हणूनच मतदारांनी भाजपा आणि शिवसेनेच्या झोळीत 161 जागांचे भरभरून दान टाकले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनीही एकत्र निवडणूक लढली होती. त्यांच्या आघाडीला 288 पैकी केवळ 98 जागा देत मतदारांनी सपशेल नाकारले होते. सत्तास्थापनेचा कौल महायुतीला मिळाला असताना सत्ता ही महायुतीचीच येणे क्रमप्राप्त होते. पण, गेल्या वेळी 122 जागा िंजकणार्‍या भाजपाला यावेळी 17 जागा कमी मिळाल्या आणि आपल्या पािंठब्याशिवाय भाजपाची सत्ता येऊ शकत नाही, याचा अंदाज आलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी नव्या सरकारचा मार्ग अवरुद्ध केला. वास्तविक, शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा मिळवणार्‍या भाजपाचा मुख्यमंत्रिपदावर नैसर्गिक दावा होता. पण, भाजपाचा हा नैसर्गिक दावा अमान्य करत शिवसेनेने आडमुठी भूमिका घेेतली आणि संपूर्ण राज्याला महिनाभर वेठीस धरले. राज्यातील जनतेला ही बाब अजीबात आवडलेली नाही. पण, सत्तातुरांपुढे कुणाचे काय चालणार? भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करता यावी यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करून पाहिले. पण, शिवसेनेने मित्रपक्षाशी चर्चा न करता ज्यांच्याविरुद्ध कौल मागितला, त्यांच्याशीच चर्चा सुरू ठेवली आणि आज शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. महिनाभर जोे राजकीय तमाशा चालला तो जनतेने पाहिला आहे. जनतेच्या मनात जे सरकार होते, त्याच्या विपरीत हे सरकार सत्तेत येत आहे, हे या पुरोगामी म्हणवणार्‍या राज्याचे दुर्दैवच म्हटले पाहिजे.
 
‘‘मी शिवसेनाप्रमुखांना आश्वस्त केले होते की, एक दिवस या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच बसवीन, शिवसैनिक आता पालखीचे भोई बनणार नाहीत, तर शिवसैनिक पालखीत बसेल!’’ असे सांगणारे उद्धव ठाकरे स्वत:च पालखीत बसायला निघाले आहेत. यांचे ओझे सत्तेची पालखी वाहणार्‍या भोयांना पेलवेल की नाही, हे येणार्‍या काळात दिसेलच! वास्तविक, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे एकनाथ िंशदे यांनाच मुख्यमंत्री करायला हवे होते. पण, ज्यांनी शिवसेनेला आपल्या जाळ्यात फसवले आहे, त्या अजित पवारांच्या काकांनी नकार दिला आणि कॉंग्रेसलाही मान्य नाही म्हणून िंशदेंना पालखीत बसवायचे सोडून पक्षप्रमुख स्वत:च पालखीत बसायला निघाले आहेत, यावरूनच त्यांची सत्ताकांक्षा लक्षात येते. ‘मी नाही त्यातली अन्‌ कडी लावा आतली,’ या वाक्प्रचाराची अनुुभूती महाराष्ट्राला करवूून देण्याचे ज्यांनी ठरविले, ते आज कट्‌टर हिंदुत्वविरोधकांना सोबत घेऊन सत्तासुंदरीसोबत संसार थाटणार आहेत, ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
 
 
संख्याबळ नसल्याचे सांगत, भाजपाने प्रारंभी सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगत अतिशय परिपक्वता दाखवली होती. अशीच परिपक्वता महाराष्ट्राच्या राजकारणात अपेक्षित आहे. पण, शिवसेनेने सगळी तत्त्वं गुंडाळून जेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार थाटण्याचा चंग बांधला, तेव्हा भाजपालाही सत्तेच्या राजकारणात उडी घ्यावीच लागली. अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले, पण दुर्दैवाने ते टिकले नाही. भाजपाने आपल्या प्रारंभीच्या भूमिकेवर राहात सत्तांध शिवसेनेला सरकार स्थापन करू दिले असते, तर ते अधिक बरे झाले असते, सगळ्यांचे पितळ उघडे पडले असते, ही जी जनभावना आहे, तीही खरीच आहे. भाजपाची प्रतिमा अधिक उजाळून निघाली असती. आज फार नुकसान झाले आहे, अशी स्थिती नाही. कारण, आज ज्या अभद्र महाआघाडीचे सरकार सत्तेवर येत आहे, त्यातला पोकळपणा नजीकच्या भविष्यात जनतेपुढे येणारच आहे. भाजपाला असलेल्या आंधळ्या आणि अघोरी विरोधातून आणि शिवसेनेच्या सत्ताकांक्षेतून या सरकारचा जन्म होत आहे. जनादेश नाकारल्यानंतरही शरद पवार विरोधात बसायला तयार नव्हते, त्यांनी उद्धवाला अलगद जाळ्यात ओढले अन्‌ आता पुरते फसवले आहे. ही फसवणूक कशी झाली, हे जेव्हा उद्धवाच्या लक्षात येईल, त्या वेळी विलंब झालेला असेल. आपणच कसे चाणक्य आहोत, हे शरद पवारांना दाखवून द्यायचे होते, तो त्यांचा हेतू साध्य होताना दिसतो आहे. परस्परविराधी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांचे कडबोळे एकत्र येऊन सरकार स्थापन करते आहे, हा महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे, हे कुणीच नाकारणार नाही!