‘क्रोनोलॉजी’ हा चित्रपट पुरुष सत्ताक समाजातल्या महिलांच्या व्यथा मांडणारा चित्रपट

    दिनांक : 30-Nov-2019
तुर्कस्तानचे दिग्दर्शक अली आयदिन यांचा ‘क्रोनोलॉजी’ हा चित्रपट महिलांवरच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवणारा आणि पुरुष सत्ताक समाजातल्या महिलांच्या व्यथा मांडणारा चित्रपट आहे. महिलांना ज्या ज्या अत्याचाराला सामोरे जावे लागते, त्या सगळ्यांविरुद्ध या चित्रपटातून निषेध नोंदवला आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक अली आयदिन यांनी सांगितले.
तुर्कस्तानमधल्या महिलांच्या न सांगितलेल्या व्यथा यातून मांडल्या असून, या चित्रपटाचे कथानक भावल्यामुळेच यात प्रमुख भूमिका करण्याचा निर्णय घेतला, असे अभिनेत्री सेर्मे इब्युझिया हिने सांगितले.
 

 
ऑस्ट्रेलियन चित्रपट ‘लिलीयान’ या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे कुठलीही पटकथा न लिहिता या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. त्यातही 5 तंत्रज्ञांनी 9 महिने दिवसरात्र मेहनत आणि संशोधन करुन हा चित्रपट पूर्ण केला, असे चित्रपटातली अभिनेत्री पॅट्रेशिया प्लॅनिक यांनी सांगितले. न्युयॉर्क शहरात अडकलेल्या निर्वासितांच्या सत्य कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे.
‘व्हाईटॅलिटी’ या चिनी चित्रपटाचे दिग्दर्शक डाँगमिन वू यांनी सांगितले की हा चित्रपट स्वयंमुक्ती आणि आत्मिक उन्नती या विषयी आहे. सर्व प्रकारच्या नातेसंबंधांमधल्या प्रेमाचे दर्शन या चित्रपटातून बघायला मिळते. तसेच सर्वसामान्य चिनी माणसांच्या हृदयात त्यांच्या देशाविषयी असलेले प्रेमही चित्रपटातून मांडण्यात आले आहे. इफ्फी 2019 मध्ये आयसीएफटी-युनेस्को गांधी पुरस्कारासाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.
‘अमाखांडो’ या अशिक्षित महिलेच्या संघर्षाची कथा मांडणाऱ्या चित्रपटाविषयी नेपाळी दिग्दर्शक धोंडूप त्सेरिंग यांनी माहिती दिली. ‘आय एम वुमन’ या ऑस्ट्रेलियन चित्रपटाच्या दिग्दर्शिका उंजू मून, ‘एक्स-द एक्स्पॉयटेड’ चित्रपटाचे निर्माते आंद्रा मुही, दक्षिण आफ्रिकन चित्रपट ‘फिएला से काइंड’ चे दिग्दर्शक ब्रेट मिशेल इन्स यांनीही या पत्रकार परिषदेत आपापल्या चित्रपटांविषयी माहिती दिली.