महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा

    दिनांक : 26-Nov-2019
 
तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या तडकाफडकी शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे, त्यामुळे आमच्याकडे पुरेसा पाठिंबा नसल्यामुळे आम्ही सरकार पुढे चालवू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे याचं नाव पुढे येत आहे. 
 

 
 
उद्यापर्यंत सर्व आमदारांचा शपथविधी व्हावा आणि मग विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला जावा, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती रामण्णा यांनी निर्णयाचं वाचन करताना सांगितलं. या फ्लोर टेस्टदरम्यान गुप्त मतदान व्हायला नको, सगळ्या प्रक्रियेचं चित्रीकरण व्हावं, असंही कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने उद्याच (बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी) महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश दिल्याच्या काही तासांनी हे दोन्ही राजीनामे आले आहेत.
त्यानंतर महाविकास आघाडीचे नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड कदाचित होऊ शकते. यासाठीची बैठक संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. शरद पवार यांनीही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या रिमोट कंट्रोलचे काय होणार हा प्रश्न सेना समर्थकांना पडला आहे.