आमच्याकडे बहुमत नाही, फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

    दिनांक : 26-Nov-2019
मुंबई : दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं सांगितलं. त्यामुळे अवघ्या चौथ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले.

 
 
            "बहुमतासाठी आवश्यक आमदार आमच्याकडे नाहीत त्यामुळे मी राजीनामा देतं आहे- देवेंद्र फडणवीस"
सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis press conference) उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची टांगती तलवार होती. देवेंद्र फडणवीस आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा करण्याची शंका होती. ती खरी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' जनतेने विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला दिलं. भाजपला जनादेश दिला. आम्ही सेनेसोबत निवडणूक लढलो. भाजपला मोठा जनादेश होता, सेनेने लढलेल्या जागांपैकी 40 टक्के जागा जिंकल्या. शिवसेनेच्या लक्षात आल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेपासून सेनेनं बर्गेनिंग सुरु केलं, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं, भाजपने कधीच मुख्यमंत्रिपद देऊ असं शिवसेनेला सांगितलं नव्हतं, न ठरलेल्या बाबींचा बाऊ करुन शिवसेनेने अडमुठेपणा केला, मुख्यमंत्रिपद दिलं नाही तर आम्ही कोणासोबतही जाऊ अशी भाजपला धमकी दिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
न ठरलेल्या बाबींचा बाऊ करून शिवसेनेने भाजपला धमकी दिली, परंतु आमच्यासोबत चर्चा करण्याऐवजी काँग्रेस-एनसीपी सोबत चर्चा केली. जे लोकं मातोश्रीबाहेर पडत नव्हते ते इतरांच्या पायऱ्या झिजवत होते. आमच्याशी बोलत नव्हते. अशातच राज्यपालांनी आमंत्रित केलं आणि सत्तास्थापनेस सांगितलं. मात्र, आम्ही आमच्याकडे संख्याबळ नसल्याचं सांगत सत्ता स्थापण्यास नकार दिला. शिवसेनेला बोलावलं त्यांनी त्यांचं कसं हसं करुन घेतलं ते महाराष्ट्राने पाहिलं. राष्ट्रवादीला देखील बोलावण्यात आलं मात्र त्यांनी देखील नकार दिला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.