3 हजार जळगावकर धावले स्वत:च्या आरोग्यासाठी

    दिनांक : 25-Nov-2019

 
 
 
जळगाव, 24 नोव्हेंबर
सागर पार्कचे मैदान, पहाटे चारची वेळ आणि स्पीकरवर आवाज येतो ’ हॅलो जळगावकर.... टाटा एआयजी खान्देश रनसाठी तयार आहात ना...’ त्याच्या प्रत्त्युत्तरात उत्तर येते. ‘हो...य...’ ‘चला तर मग थोडा वार्मअप करू या..’ आणि सुमारे 3 हजार जळगावकर रेकार्डप्लेअरच्या तालावर वार्मअप करू लागतात! वार्मअप होताच घोषणा होते 21 किमी रनअप साठी स्पर्धकांनी जावे.....निमित्त होते जळगाव रनर्स गृपने आयोजित केेलेल्या ‘टाटा एआयजी खान्देश रनचे’
 
 
जळगावातील सर्व वयोगटांच्या सुमारे 3 हजार महिला व पुरुषांनी स्पर्धेत स्पर्धक म्हणून जरी सहभाग घेतला असला तरी तो जिंकण्यासाठी नव्हे तर स्वत:च्या आरोग्यासाठी घेतला होता. पहाटे चार वाजल्यापासून स्पर्धक जळगाकरांनी सागर पार्कवर हजेरी लावली. व्यासपीठावरुन केल्या जाणार्‍या सूचनांनुसार आपापल्या वयोगटानुसार वार्मअप करून स्टार्ट पॉईंटवर धावण्यासाठी तयार झालेत. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवताच त्यांनी धावण्यास सुरवात केली.
 
 
पहाटेच्या गुलाबी थंडीत सागर पार्क, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट, महाबळ कॉलनी, मोहाडी रोड, लांडोरखोरे ते संभाजी नगर, महाबळ कॉलनीमार्गे परत सागरपार्क हा सर्व रस्ता धावपटूंनी फुलून गेला होता. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ठिकाणी बँड, भजन पथक, मोटू पतलू कार्टून, फुलांचा वर्षाव होत होता. लहान मुले-मुली, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, महिलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
 
 
स्पर्धकांना प्रेरित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू सतीश गुजरान यांच्या उपस्थितीत 21 कि. मी. च्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. पहाटे 5.30. ला 21 किमीच्या स्पर्धेस सुरुवात झाली. 6 वाजता 10 किमीच्या, 6.30 वाजता 5 किमीच्या आणि 3 किमीच्या स्पर्धेस सकाळी 7 व 7.30 वाजता सुरुवात झाली. आरोग्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी, त्याचप्रमाणे सर्व शहर या रन निमित्ताने एकत्रित यावे, आपापसात जिव्हाळा निर्माण व्हावा, मैत्री वृद्धिंगत व्हावी, शहरात एकोपा वाढवा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून जळगाव रनर्स ग्रुपने खान्देश रनचे आयोजन केले होते.
 
 
चक्क नऊवारीत धावल्या महिल्या!
स्पर्धेकांना प्रोत्साहित करण्यासाठी नऊवारी साडीसह पारंपरिक वेशभूषेतील 25-40 वयोगटाच्या शहरातील सुमारे 20-25 महिला काही अंतर धावल्यात. सहभागी खेळाडूसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवल्या होत्या. विविध शालेय बँड पथके, लेझीम, ढोल ताशेचे पथक, एन. सी. सी. बँडने स्पर्धेकांना चेअरअप केले.
 
 
स्पर्धकांना फिनिशर्सचे मेडल
स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धेकांना स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल ‘फिनिशर्स’चे खास मेडल, ई-प्रमाणपत्र देण्यात आले.
 
 
सेल्फी झोन
स्पर्धकांसाठी वयोगटानुसार सेल्फी झोन ठेवण्यात आला होता. तेथे स्पर्धक फोटो काढून घेत होते. तर टायमिंग फोटो झोनमध्ये स्पर्धेकाने त्याचा क्रमांक सांगून त्याचे नाव, वयोगट, स्टार्ट अप टाईप आणि फिनिशींग टाईप याची नोंद असलेल्या डिजिटल फलकासमोर उभे राहून फोटो काढण्याची व्यवस्था केली होती. अनेक स्पर्धेकांनी याचा लाभ घेत फोटो काढलेत.
 
 
पत्रकारांना प्रवेश नाकारला!
सागर पार्क येथे असलेल्या मुख्य कार्यक्रमस्थळी स्पर्धेनंतर पत्रकारांना एका कार्यकर्त्याने प्रवेशव्दारातून आत जाण्यास मनाई केली. त्यांना पत्रकार असल्याच्या आयडी प्रुफची मागणी केली. यावेळी पत्रकारांनी आयोजकांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांना सागरपार्कच्या कार्यक्रम स्थळी सोडण्यात आले. यशस्वीतेसाठी आयोजक किरण बच्छाव, डॉ.रवी हिराणी, अविनाश काबरा, निलेश भांडारकर, विक्रांत सराफ, डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.विवेक पाटील, ज्ञानेश्वर बढे व उमेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.