राहुल गांधी पाचव्या दिवशीही अधिवेशनात अनुपस्थित

    दिनांक : 23-Nov-2019
राहुल गांधी पाचव्या दिवशीही अधिवेशनात अनुपस्थित  
 
 
 
नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या 5 दिवसाच्या कार्यकाळात एकही दिवस राहुल गांधी सभागृहात हजर राहिले नाही. सध्या लोकसभेत महत्वाचे विषय चर्चीले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अनुपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
 

 
 

लोकसभेत सध्या दिल्लीतील वाढलेलं प्रदूषण, एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप), जम्मू काश्मीरची परिस्थिती, गांधी कुटुंबाची काढलेली एसपीजी सुरक्षा यावरुन संसदेच्या खालच्या सभागृहात चर्चा होत आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी उपस्थित का नाहीत? असे प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील 5 दिवसात फक्त एकच दिवस सभागृहात उपस्थित राहिले आहेत. यावरुन भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी टीका केली आहे. तरुण खासदारांनी सभागृहात गैरहजर राहणे निराशाजनक असल्याचे ते म्हणाले. आम्ही वयस्क असतानाही सभागृहात हजर राहतो. या खासदारांचा असा दृष्टीकोण योग्य नसल्याचे पाल म्हणाले. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडावे म्हणून ते आपल्याला संसदेत पाठवतात. मात्र, तरीही राहुल गांधी एकही दिवस सभागृहात हजर नसल्याची टीका भाजप नेत्याने केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात.