आपले शिक्षण पाश्चात्यांच्या वैचारिक गुलामगीरीतले - सोनम वांगचुक

    दिनांक : 23-Nov-2019
 आपले शिक्षण पाश्चात्यांच्या वैचारिक गुलामगीरीतले - सोनम वांगचुक 
 
 
नागपूर: आपली आजची शिक्षणपद्धती चुकीच्या मार्गाने जात आहे. आपण पाश्चात्त्यांच्या वैचारिक गुलामगिरीतून शिक्षण घेत आहोत. शिक्षण म्हणजे पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट करणे व त्यानंतर नोकरी करणे, ही आपल्या शिक्षणाची व्यथा आहे. यात भारतीय मूल्य कुठेच नाही. त्यात जगण्याचा विचार नाही. केवळ बौद्धिक कसरती म्हणजे शिक्षण नाही. भारतीय मूल्याधारित शिक्षणातूनच व्यक्तिमत्त्वाचा खरा विकास साधू शकतो, असे मत सुप्रसिद्ध वैज्ञानिक संशोधक सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.
 

 
 
द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल आणि साऊथ पॉईंट स्कूल यांच्या वतीने आयपीईसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी शिक्षणविषयक मते मांडली. पाश्चात्त्यांचा शिक्षणाबाबतचा विचार ‘रीडिंग-रायटिंग-अरिथमॅटिक’ असा आहे तर भारतीय मूल्य संस्कृतीत बुद्धी, कौशल्य विकास आणि संवेदनशीलता असा शिक्षणाचा विचार आहे. आज जी शिक्षण पद्धती सुरू आहे त्यात केवळ बौद्धिक कसरती आहेत. बुद्धीची कामे करू शकणारा म्हणजे शिक्षित. ही संकल्पनाच संपूर्णपणे चुकीची आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणदोषात्मक विचार करण्याची क्षमताच नष्ट होत आहे. मार्कलिस्टवरच्या गुणांच्या टक्केवारीच्या स्पर्धेतच आम्ही गुंतलो आहे. त्यामुळेच जगभरात पर्यावरणाचे, धार्मिक भेदांचे, आर्थिकतेचे, दहशतवादाचे, सत्तेचे आणि हिंसेचे प्रश्न निर्माण झाले आहे कारण जगायचे कशासाठी, कुणासाठी आणि का? या प्रश्नांची उत्तरेच आजच्या शिक्षणपद्धतीतून मिळत नाही.
 
 
भारतीय पद्धतीत पूर्वी गुरू-शिष्य परपंरा होती. यात पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाधारित शिक्षणाचा विचार होता. त्यातून कौशल्य विकासाचा विचार आणि हे ज्ञान आणि कौशल्य कुणासाठी सकारात्मकतेने उपयोगात आणायचे हा संवेदनशीलतेचा विचार देणारा संस्कार मिळणारी शिक्षण पद्धती होती. आता आपणच ती विसरलो आहोत. मेंदूला शिक्षणाच्या नावाखाली बौद्धिक कसरतीत अडकवून कौशल्य, संवेदना आम्ही संपवून टाकल्या आहे. ही पाश्चात्त्यांची गुलामगिरीची शिक्षणपद्धती केवळ 300 वर्षांची आहे. यातून बंदिस्त शाळा तयार झाल्या. मुलांमध्ये खेळातून शिकण्याची नैसर्गिक वृत्ती असते. हा भाव प्रत्येक प्राण्यात आहे. पण, आपण मुलांमध्ये समस्या निर्माण करतो. त्यांच्या ऊर्जेला योग्य मार्ग देण्याचा प्रयत्नच केला जात नाही. या चुकीच्या प्रणालीत एखादा मुलगा मागे राहिला तर कदाचित तो जास्त हुशार असण्याची शक्यता मला वाटते. त्यामुळे या शिक्षण पद्धतीने आपण पिछाडलो, असे मला वाटते. ज्या ज्ञानामुळे आपण इतरांच्या उपयोगात येऊ शकत नाही, समाजाचे भले करू शकत नाही आणि समस्यांवर उपाय शोधू शकत नाही, ते ज्ञानच नाही. त्यामुळे भारतीय मूल्यांची शिकवण देणारे शिक्षण आपण अंगिकारले पाहिजे, असे मत सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.