थकबाकीपोटी फुले मार्केटमधील 16 गाळे ‘सील’

    दिनांक : 22-Nov-2019
 

 
 
जळगाव, 21 नोव्हेंबर
महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील अनाधिकृत कब्जेदार व थकबाकीदार असलेल्या 16 गाळेधारकांच्या गाळ्यांना गुरूवारी महापालिकेच्या महसूल विभागाचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी पंचनामे करून सील लावले.
 
 
या कारवाईमुळे अनाधिकृत कब्जेदार थकबाकीदार गाळेधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई सुरु असतांना दोन्ही व्यापारी संकुलात स्मशान शांतता पसरली होती. या कारवाईबाबत गाळेधारक आपापसात याबाबत काहीतरी केले पाहीजे असल्याची चर्चा करतांना दिसत होते.
 
 
2012 पासून महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांचा करार संपला आहे. तो नव्याने करण्याबाबत महापालिकेने कार्यवाही सुरु केली होती. परंतु गाळेधारक जिल्हा न्यायालय, खंडपीठासह सर्व्वोच्च न्यायालयात गेले होते.
 
 
या प्रक्रियेत सात वर्ष गेली. अखेरीस न्यायालयाने या सात वर्षात भाडे करार नसल्याने हे गाळेधारक अनधिकृत कब्जेदार ठरले, त्यांच्याकडून सात वर्षातील नुकसान भरपाईची बिले देत ती वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना 81 ब व क अशा दोन नोटीसा बजावल्यात. 81 ब नुसार थकबाकीदार गाळेधारकाने नोटिशीत दिलेल्या मुदतीत रक्कम मनपात जमा करणे गरजेचे होते. ते न केल्याने मनपाने त्यांना 81 कची नोटीस बजावली. त्यातही गाळेधारकांना नुकसान भरपाईची रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत रक्कम न भरल्यास सदर गाळे ताब्यात घेत त्यांचा लिलाव करण्याची तरतूद असल्याचे या नोटिशीत नमूद आहे.
गुरूवारी सकाळी 12 च्या सुमारास मनपा महसूल उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे, वसुली अधिक्षक नरेंद्र चौधरी, विधी अधिकारी किरण भोळे यांच्या दोन पथकांनी महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये गाळे सील करण्याची कारवाई केली. तासाभरात तब्बल 16 गाळ्यांना सील केले.
 
 
सुरू असलेल्या गाळ्यांना केले सील
सकाळी 12 च्या सुमारास अनेक गाळेधारकांनी आपापली दुकाने उघडून व्यवसायास सुरुवात केली होती. मनपाचे पथक येतांना दिसताच काही गाळेधारकांनी तातडीने दुकाने बंद करुन संकुलातून घरी निघून जाणे पसंत केले. तर काहींची दुकाने सुरु असतांना पथकाने त्यांना दुकानातून बाहेर निघण्यास सांगत दुकानातील वीज पुरवठा खंडीत केला. तर मनपाचे व्हिडीओग्राफर किशोर सोनवणे यांनी दुकानाच्या आत जात सर्व व्हिडीओ चित्रण केले. त्यानंतर दुकानाचे शटर ओढून त्यावर मनपाचे एक व संबंधित दुकानदाराचे एक अशी दोन्ही कुलूपे लावून ती सील केली आणि शटरवर नोटीस लावली.
 
 
अन् गाळेधारकाला शोक अनावर
शहर पोलीस स्टेशनकडील बाजूकडून असलेल्या महात्मा फुले मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील दुकान क्रमांक 80 मध्ये ओम हॅन्डलूम हाऊस हे दुकान सील करण्यासाठी पथक पोहचले. दुकान सुरू असल्याने त्यांनी मालकास बाहेर बोलावत दुकान सील करत असल्याचे सांगितले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे घाबरून जात कारवाईस स्टे असल्याचे सांगू लागले. त्यावर पथकाने स्टे ऑर्डर दाखवण्याची मागणी केली. तोपर्यंत दुकानातील वीज पुरवठा खंडीत करण्यात येवून आतील भागाचे व्हिडीओ चित्रणही करण्यात आले. यावेळी बाहेरून दुकान एक असल्याचे दिसत असले तरी आत मात्र तीन मजले असल्याचे मनपाच्या पथकाला आढळून आले. उपायुक्तांनीही दुकानात जात त्याची पाहणी केली. या वेळेत दुकानदाराने न्यायालयात याचिका दाखल केल्याची प्रत दाखवली. याचिका म्हणजे स्टे नसल्याचे सांगत पथकाने दुकान सील करण्याची कारवाई पूर्ण केली. डोळ्यादेखत दुकान मालासह सील होत असल्याचे पाहताना दुकानदाराला रडू कोसळले.
 
 
टेलरिंगचा सामान काढला बाहेर
सेंट्रल फुले मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील दुकान क्रंमाक 119 मधील चांदणी लेडीज टेलर्सच्या दुकानातील शिलाई मशिन व इतर साहित्य बाहेर काढून गाळा रिकामा करत तो सील केला.
 
 
अन् दुकाने झालीत बंद
कारवाई करण्यापूर्वी या 16 दुकानदारांना महापालिकेने बोलावून रक्कम जमा करण्यास व काही न्यायालयीन आदेश असल्यास ते दाखवण्यास सांगितले होते. परंतु रक्कम आणि स्टे आदेश कोणीही दिले नाही. अखेर ही कारवाई शांततेत पूर्ण करण्यात आली.
 
 
दुकाने सील करण्याची कार्यवाही सुरु होताच या सोळा गाळेधाराकांपैकी काहींनी कामगार, व ग्राहकांना तातडीने दुकानाबाहेर काढून दुकानास कुलूप लावून थेट घरी जाणे पसंत केले. यामुळे कामगार दुकानाबाहेर थांबले होते. पथकाने त्यांना विचारणा केली असता मालक कुलूप लावून निघून गेल्याचे सांगितले. मनपा पथकाने शटरला कुलूप लावून सील करून नोटीस शटरवर
डकवण्याची कारवाई केली.