डॉ. फिरोज खान यांना रा.स्व.संघाचेही समर्थन

    दिनांक : 22-Nov-2019
डॉ. फिरोज खान यांना रा.स्व.संघाचेही समर्थन 
 
बनारस हिंदू विश्व विद्यालयात संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून मान्यता मिळाल्यानंतर डॉ. फिरोज खान यांना विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवित आंदोलन केले. धार्मिक विधी विषयक गैर हिंदू प्राध्यापकाने शिक्षण दिल्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत विद्र्यार्थ्यानी डॉ. फिरोज खान यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला. या विषयी वेगवेगळी मत मतांतरे होत असताना आता रा. स्व. संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 

 
 
 
डॉ. फिरोज खान यांच्या निवडीवरून सुरु झालेल्या विवादावर संघाच्या एका बैठकीत चर्चा  झाली. यानंतर डॉ. फिरोज खान यांना विरोध करणे चुकीचे असून यामुळे सामाजिक सौहार्दाला धक्का बसतो असे संघाने स्पष्ट मत व्यक्त केले आहे. काशीचे विभाग संघचालक डॉ. जयप्रकाश लाल यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत असे म्हंटले आहे कि संस्कृत साहित्याला समर्पित व श्रद्धा भावाने शिकवणाऱ्या व वैधानिक मार्गाने निवड झालेल्या प्राध्यापकास विरोध करणे योग्य नाही. संघ या विरोधाशी सहमत नाही, असे सांगत त्यांनी डॉ. फिरोज खान यांचे समर्थन केले आहे.
 
 
डॉ. मदनमोहन मालवीय यांचे चिरंजीव तथा कुलपती गिरधर मालवीय यांनीही डॉ. फिरोज खान यांना होणाऱ्या विरोधास अयोग्य ठरविले आहे. डॉ. फिरोज यांच्या विद्वत्तेचे स्वागत झाले पाहिजे. विरोध करणाऱ्यांनी हिंदू विश्व विद्यालयात हिंदू धर्माची व्याख्या काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. असे सांगत त्यांनीही डॉ. फिरोज खान यांचे समर्थन केले आहे.