कॉंग्रेस राष्ट्रवादीला 'महाशिवआघाडी' नावाचं वावडं; म्हणे महाविकास आघाडी म्हणा !

    दिनांक : 22-Nov-2019

कॉंग्रेस राष्ट्रवादीला 'महाशिवआघाडी' नावाचं वावडं; म्हणे महाविकास आघाडी म्हणा ! 

  

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्तरित्या स्थापन होणाऱ्या सरकारचे नाव 'महाशिवआघाडी' नाही तर 'महाविकासआघाडी' असेल अशी माहिती समोर येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'महाशिवआघाडी' हे नाव मंजूर नसल्याची माहिती समोर आली आहे, याचे कारण म्हणजे महाशिवआघाडी या नावात फक्त शिवसेनेचे नाव असल्याने त्याला आघाडीच्या संयुक्त बैठकीत आक्षेप घेतल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता हे नाव बदलून महाविकासआघाडी असे करण्यात येणार आहे.

 

 
 
 

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि सरकार स्थापनेच्या जवळ पाऊल टाकले आहे. वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या या तिन्ही पक्षांची किमान समान कार्यक्रमावर सहमती काँग्रेस आपल्या विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही, हे आघाडीच्या बैठकीत ठरले आहे. बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. वादग्रस्त मुद्दे ना शिवसेना उपस्थित करणार ना काँग्रेस-राष्ट्रवादी. यावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

 

परंतु शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह छोट्या पक्षांची जी आघाडी बनेल त्याचं नाव महाशिवआघाडी नसेल. तर या सरकारचं नाव महाराष्ट्र विकास आघाडी असेल. यामध्ये समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमान शेतकरी संघटनेसह मित्रपश्रांचा समावेश असेल.

 

सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल. या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील, एक काँग्रेसचा आणि दुसरा राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती, परंतु बहुतांश नेते यासाठी राजी झाले नाही. काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोनिया गांधींवर सोपवण्यात आला आहे.