डॉ. फिरोज खान नियुक्तीचा वाद...

    दिनांक : 22-Nov-2019

डॉ. फिरोज खान नियुक्तीचा वाद...


श्रीनिवास वैद्य
 

बनारस हिंदू विद्यापीठात प्रा. फिरोज खान यांची संस्कृत विभागात सहायक प्राध्यापक म्हणून झालेली नियुक्ती सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. फिरोज खान यांच्या नियुक्तीला विरोध करीत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आता, नाव फिरोज खान, त्यातच ते संस्कृतचे पंडित आणि विद्यार्थ्यांचा विरोध... हे तीन मुद्दे एकत्र आल्यावर सेक्युलर विद्वान, पत्रकार यात कुदणारच ना! लगेच हिंदूंना सर्वसमावेशकतेचे, सहिष्णुतेचे, गंगा-जमनी संस्कृतीचे ज्ञान पाजणे सुरू झाले. यात, फाजील सहिष्णुतेच्या प्रभावाखाली असलेले हिंदू लोकही वाहवत गेले आहेत. फिरोज खान का नाही शिकवू शकत संस्कृत? खरेतर याचे स्वागतच करायला हवे! संस्कृत शिकलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम तुम्हाला चालतात. मग डॉ. फिरोज खान का नाही? कुणी म्हणते की, आम्हाला मुस्लिम शिक्षकांनीच संस्कृत शिकविले. त्यात वावगे काय?

 

 
 

फाजील सहिष्णू हिंदूंचा हा युक्तिवाद पूर्णत: चूक म्हणता येणार नाही. परंतु, फिरोज खान यांची नियुक्ती संस्कृत भाषेतील साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र वगैरे शिकविण्यासाठी झालेली नाही. तसे असते तर कुणीच आक्षेप घेतला नसता. अलिगड मुस्लिम विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख मुस्लिम व्यक्तीच आहे. कुणीही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. तिकडे, डॉक्टरेट असलेले फिरोज खान खंत व्यक्त करताना म्हणतात- सारे आयुष्य संस्कृत शिकण्यात गेले. त्याने मी मुसलमान आहे, असे मला कधीही जाणवले नाही. परंतु, आता या वादाने मला ती जाणीव करून दिली आहे. मनात प्रश्न येतो की, कोण बरोबर आहे? फिरोज खान व त्यांची बाजू घेणारे की, त्यांच्या नियुक्तीला विरोध करणारे? हा निर्णय करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.


1. मुळात डॉ. फिरोज खान यांची नियुक्ती बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विद्या व धार्मिक विज्ञान या विभागात करण्यात आली आहे. म्हणजे संस्कृत भाषा िंकवा साहित्य आणि संस्कृत विद्या व धार्मिक विज्ञान हे वेगवेगळे प्रांत आहेत. हे पद संस्कृत शिक्षकाचे नाही, तर हिंदू सिद्धान्तरूप धर्मशास्त्राचे (थिऑलॉजी) आहे. यात धर्मशास्त्र व कर्मांगे (म्हणजे हिंदू कायदा व वैदिक कर्मकांड) शिकवणे अपेक्षित आहे. अर्थातच, यासाठी नियुक्त शिक्षकाला वैदिक कर्मकांडाचे सखोल व व्यापक ज्ञान अपेक्षित आहे. तसेच कर्मकांडांमधील निहितार्थ समजून घेण्यासाठी नियुक्त शिक्षक, ही सर्व कर्मकांडे स्वत: आचरीत असणे आवश्यक आहे. आता सांगा की, इस्लाम धर्म आचरीत असलेले डॉ. फिरोज खान या पदासाठी लायक आहेत का? तेही शिखाधारी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी?


2. यज्ञ हा अवैदिक करू शकत नाही. यज्ञ व तदनुषंगिक कर्मकांडे करण्यासाठी वैदिक असणे आवश्यक आहे. परंतु, फिरोज खान हे मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या धर्मानुसार यज्ञ हा ‘हराम’ आहे. त्यामुळे या कर्मकांडाचे त्यांना सखोल ज्ञान असणे शक्य नाही. दुसरे म्हणजे एकेश्वरवादी व मूर्तिपूजा न मानणारा मुस्लिम, बहुदेवत्वाचे तत्त्व कसे काय शिकवू शकणार? मूर्तिपूजेचे महत्त्व व त्यामागील विज्ञान कसे काय शिकविणार? तिथल्या पंडित विद्यार्थ्यांना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कसे काय शिकवू शकणार?

 

एका साधूची कथा इथे आठवते. गावातील एक महिला, आपल्या लहान मुलाला त्या साधूकडे आणते. त्यांच्या पायावर घालत ती तक्रार करते की, महाराज, माझा हा मुलगा सतत गूळ खात असतो. सांगून, रागावून, मारूनही झाले, परंतु तो ऐकत नाही. तुम्ही काही सांगितले तर तो ऐकेल, या आशेने मी तुमच्याकडे आले आहे. साधू त्या महिलेला पंधरा दिवसांनी येण्यास सांगतात. पंधरा दिवसांनंतर ती महिला साधूकडे येते. साधू तिला आणखी पंधरा दिवसांनंतर यावयास सांगतात. साधूची अशी टोलवाटोलवी दोन महिने चालते. शेवटी ती महिला कंटाळून शेवटचे म्हणून साधूकडे येते. यावेळी साधू त्या मुलाला जवळ घेतात आणि म्हणतात- बेटा, गूळ खाणे वाईट नाही. परंतु, सतत खाणे वाईट आहे. यापुढे असे करू नको. ती महिला मोठ्या आशेने घरी जाते. आश्चर्य म्हणजे, त्या दिवसापासून तिचा मुलगा सतत गूळ खाणे सोडून देतो. त्या महिलेला आनंद होतो, पण मनात एक प्रश्न उभा राहतो. त्याच्या निराकरणासाठी ती पुन्हा एकदा साधूची भेट घेते. म्हणते- महाराज, तुम्ही सांगितल्यानंतर माझ्या मुलाने खरेच गूळ खाणे सोडून दिले आहे. पण, हेच सांगायला तुम्ही दोन महिने का घेतलेत? पहिल्या वेळीच सांगता आले असते. साधू हसतो आणि म्हणतो- माई, मलाही सतत गूळ खाण्याची खोड होती. स्वत:लाच जीभ आवरत नाही आणि दुसर्‍याला उपदेश कसा द्यायचा? म्हणून जोपर्यंत माझी ही सवय जात नाही, तोपर्यंत मी तुम्हाला बोलवीत राहिलो. ज्या दिवशी माझे माझ्या जिभेवर नियंत्रण आले, त्या दिवशी तुमच्या मुलाला उपदेश दिला आणि त्यामुळेच त्याच्यावर त्वरित परिणाम झाला. शिकवण समोरच्याच्या गळी उतरण्यासाठी तसे आचरणही असावे लागते, हे सांगणारी ही बोधकथा सर्वांनाच माहीत असेल.

 

या सर्व कारणांमुळे, बनारस हिंदू विद्यापीठ कायद्यात स्पष्ट केले आहे की, संस्कृत महाविद्यालयातील सिद्धान्तरूप हिंदू धर्मशास्त्र (िंहदू थिऑलॉजी) विभागात शिक्षकाची निवड करताना, ती व्यक्ती हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार आचरण करणारी असावी. असे असताना यात मुस्लिम व्यक्ती कशी काय लायक ठरू शकते?

 

3. अलिगड मुस्लिम विद्यापीठातील संस्कृत विभाग प्रमुख प्रा. मोहम्मद शरीफ काय म्हणतात ते पाहू. प्रा. शरीफ मानतात की, डॉ. फिरोज खान यांची नियुक्ती करून बनारस हिंदू विद्यापीठाने अजाणतेपणी चूक केली आहे. फिरोज यांना कर्मकांडाऐवजी दुसरा विषय देऊन विवाद टाळता आला असता.


प्रा. शरीफ पुढे म्हणतात की, बनारस हिंदू विद्यापीठाच्या धर्मशास्त्र विभागाच्या इमारतीवर एक शिलालेख प्रारंभापासून आहे. त्यात लिहिले आहे की, कर्मकांड केवळ हिंदू शिक्षकच शिकवतील. निवड करण्याआधी विद्यापीठाने नियमांतील बारकावे लक्षात घ्यायला हवे होते. माझे व्यक्तिगत मतदेखील हेच आहे की, कर्मकांड शिकविण्यासाठी त्याच धर्मातील व्यक्ती असायला हवी.


4. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या धर्मशास्त्र विभागात दोन भाग आहेत. 1. सुन्नी धर्मशास्त्र व 2. शिया धर्मशास्त्र. सुन्नी धर्मशास्त्र विभागात शियाची नियुक्ती होत नाही आणि शियांच्या विभागात सुन्नी व्यक्ती नियुक्त होत नाही. यालाही कारण हेच की, शिकविणारी व्यक्ती ते कर्मकांड आचरणात आणणारी असावी.


5. जर डॉ. फिरोज खान यांच्यात वैदिक धर्मशास्त्र शिकविण्याची तीव्र इच्छा असेल, तर त्यांना हे धर्मशास्त्र खर्‍या अर्थाने आचरणात आणणे आवश्यक आहे. इस्लाम आचरणार्‍या एखाद्या मुस्लिमाने हिंदू धर्मशास्त्र शिकविणे, ही हिंदूंची थट्‌टा आहे. एखादा हिंदू पंडित हदिथ व कुराणचा तज्ज्ञ असल्याची कल्पना आपण करू शकतो काय? मदरशामधील विद्यार्थ्यांना इस्लाम धर्मशास्त्राची संकल्पना समजावून सांगण्याचा दावा करणार्‍या एखाद्या हिंदू पंडिताची आपण कल्पना करू शकतो? मुस्लिम धर्मगुरू हे मानतील? धर्मशास्त्राचे सखोल ज्ञान व कर्मकांडांचे प्रत्यक्ष आचरण नसेल तर कुणी वैदिक विद्वान कसा काय होऊ शकतो? हा युक्तिवाद अगदी टोकापर्यंत ताणायचाच म्हटला, तर हिंदू धर्मशास्त्र व कर्मकांड हा विषय बौद्ध, जैनदेखील शिकवण्यास लायक नसणार. कारण ते वैदिक कर्मकांड मानतच नाहीत, तर आचरणात कसे आणणार? आणि आचरणातच नाही तर शिकविणार कसे? उद्या पौरोहित्य शिकविण्यासाठी अवैदिक व्यक्ती कितीही तयारीची असली, तरी तिची निवड करता येईल का? त्यामुळे आम्ही मुळात हे समजून घेतले पाहिजे की, फिरोज खान यांच्यासंबंधी जो वाद सुरू आहे, तो संस्कृत भाषेच्या संदर्भातला नाही. संस्कृत भाषा व धर्मशास्त्र-कर्मकांड हे दोन विषय वेगळे आहेत, हे लक्षात घेतले तर मनात कुठलाही संभ्रम (कुणी कितीही निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही) राहणार नाही. मुळातच हा अत्यंत तांत्रिक मुद्दा आहे. त्याला हिंदू-मुस्लिम, कट्‌टरता-उदारता वगैरे रंग देण्यात अर्थ नाही.


तर असा हा वाद आहे. भारतातील मीडिया, विद्वान इत्यादी मंडळी पूर्ण सत्य कधीच सांगणार नाहीत. त्यांना येनकेनप्रकारेण हिंदू समाजाला झोडपायचेच असल्याने, त्यांच्या हातात हे एक चांगले कोलीत सापडले आहे. त्यांच्या गदारोळाने सर्वसामान्य हिंदूदेखील गांगरून गेला आहे आणि या कथित सेक्युलर व सहिष्णू मंडळींचेच बरोबर आहे, असा एक भाव सर्वसामान्यांच्या मनात अंकुरित होत आहे. परंतु, हे प्रकरण नेमके काय आहे, याची माहिती घेऊनच या अंकुराला खतपाणी द्यायचे की ते तिथेच खुडायचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.